नवी दिल्ली – कर्नाटकने संधिसाधू आणि स्वार्थी आघाडी सरकारचा दीर्घकाळ पाहिला आहे. अशा सरकारांकडून कर्नाटकचे नेहमीच नुकसान झाले आहे, त्यामुळे कर्नाटकच्या जलद विकासासाठी पूर्ण बहुमत असलेले स्थिर भाजप सरकार अत्यंत महत्त्वाचे आहे. कर्नाटक हे भारताच्या विकासाचे उगवते पॉवरहाऊस व्हावे अशी भाजपची इच्छा आहे तर कॉंग्रेसला हे राज्य त्यांच्या नेत्यांसाठी एटीएम बनवायचे आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
कर्नाटकची राजधानी बेंगळुरूमधील देवगेरे येथे मोदी यांनी रोड शो केला. त्यावेळी ते म्हणाले की, आज विजय संकल्प मेळावा होत आहे, त्याचवेळी आमच्या कर्नाटकात कॉंग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांचे क्षेत्र असलेल्या कलबुर्गी येथे भाजपचे महापौर, उपमहापौर निवडून आले आहेत. कॉंग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या घरी भाजपच्या विजयाचा गजर झाला. विजय संकल्प रॅलीचा हा एक प्रकारचा शुभसंकेत आहे की विजय यात्रा सुरू झाली आहे. या निकालाने कर्नाटकने डबल इंजिन सरकारला दणका देऊन परतण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट होत आहे.
मोदी म्हणाले की, काल मी सोशल मीडियावर कर्नाटकचा व्हिडिओ पाहिला. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री, पक्षाचा एक मोठा नेता आपल्याच पक्षाच्या कार्यकर्त्याला जाहीरपणे थप्पड मारण्यात आनंद घेत होता. जे आपल्या कार्यकर्त्यांचा आदर करू शकत नाहीत, ते जनता जनार्दनचा आदर कसा करणार? कर्नाटक भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता माझ्यासाठी खंबीर साथीदार आहे. इथला प्रत्येक कार्यकर्ता माझा चांगला मित्र, माझा भाऊ आहे. मोदी पुढे म्हणाले की, कॉंग्रेसचे लोक ‘मोदी तेरी कबर खुदेगी’ म्हणतात, पण त्यांना माहित नाही की कर्नाटकातील लोकांचे ‘मोदी तेरा कमल खिलेगा’ हे स्वप्न आहे. तत्पूर्वी, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या उपस्थितीत चिकबल्लापूर येथील मधुसूदन साई इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्चचे पंतप्रधान मोदींनी उद्घाटन केले.