नवी दिल्ली – कर्नाटक सरकारच्या सादर झालेल्या अर्थसंकल्पात हनुमानाचे जन्मस्थान मानले गेलेल्या अंजनाद्री टेकडीच्या पर्यटन विकासासाठी १०० कोटी रूपयांची तरतूद केली गेली आहे. कोप्पल जिल्ह्यातील अंजनाद्री टेकडी आणि आजूबाजूचा परिसर पौराणिक आणि ऐतिहासिक महत्त्वाचा आहे. या भागात पर्यटन विकसित करण्यासाठी १०० कोटी रुपये दिले जातील, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी कर्नाटक विधानसभेत अर्थसंकल्प सादर करताना सांगितले.
भाजपचे माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी फेब्रुवारी 2023 च्या अर्थसंकल्पात हा विषय मांडला होता. पण त्याचे पुढे काही झाले नाही. हेच काम आता सिद्धरामय्या सरकारने पुर्ण करायचे ठरवले आहे.
अंजना यांच्या पोटी जन्मलेल्या भगवान हनुमानाचे दुसरे नाव अंजनेय असे असून त्यांच्या नावावरून अंजनाद्री हिल्स हे नाव पडले आहे. कोप्पल जिल्ह्यात तुंगभद्रा नदीच्या पलीकडे अनेगुंडी जवळ हे स्थळ आहे. पौराणिक कथेनुसार हे ठिकाण किष्किंदा या नावाने ओळखले जात असे. येथे हनुमानाच्या दर्शनासाठी अनेक भाविक येत असतात. ही टेकडी सूर्यास्ताच्या विहंगम दृश्यांसाठी, जवळपासची निसर्गरम्य ठिकाणे आणि पर्वत तसेच खडकांमधून वाहणारी तुंगभद्रा नदीसाठीही प्रसिद्ध आहे.
कर्नाटकातून आंध्र प्रदेशातील तिरुमला आणि श्रीशैलम आणि महाराष्ट्रातील गुड्डापूर या तीर्थक्षेत्रांना जाणाऱ्या कर्नाटकातील भाविकांसाठी त्या राज्यांत सुसज्ज निवासी संकुल बांधले जात असल्याचे नमूद करून सिद्धरामय्या पुढे म्हणाले की, सरकारने चालू वर्षात उत्तर प्रदेशातील वाराणसी येथेही पाच कोटी रूपये खर्चुन भाविकांच्या भवनाच्या बांधकामाचे काम हाती घेतले आहे.