नवी दिल्ली- कर्नाटक राज्याचे डीजीपी प्रवीण सूद यांची केंद्रीय अन्वेषण ब्युरो म्हणजेच सीबीआयच्या संचालकपदी दोन वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. प्रवीण सूद हे 1986 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत.
सध्याचे सीबीआयचे विद्यमान संचालक सुबोध कुमार जैस्वाल यांचा कार्यकाळ 25 मे रोजी संपणार आहे त्याच अनुषंगाने प्रवीण सूद यांची नवीन संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीची बैठक पार पडली, या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी हे उपस्थित होते.
या बैठकीमध्ये 3 नावे निवडण्यात आली होती ज्यामध्ये प्रवीण सूद, मध्य प्रदेशचे डीजीपी सुधीर सक्सेना आणि वरिष्ठ आयपीएस ताज हसन यांचा समावेश होता परंतु शेवटी कर्नाटकचे डीजीपी प्रवीण सूद यांच्या नावावर निवड समितीने शिक्कामोर्बत केला आहे.