कर्नाटकने सांगली, कोल्हापूर, सातारा, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी होणारा ऑक्‍सिजन पुरवठा रोखला

कोल्हापूर, दि. 6- केंद्र सरकारकडून अन्य राज्यांमधून ऑक्‍सिजन पुरवठा करण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यासाठी ऑक्‍सिजन एक्‍सप्रेसही सुरु करण्यात आली. पण आज कर्नाटक सरकारने अचानकपणे सांगली, कोल्हापूर, सातारा, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसाठी होणारा ऑक्‍सिजन पुरवठा रोखला आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये ऑक्‍सिजनचा मोठा तुटवडा भासण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

केंद्र सरकारकडून राज्याला मिळणारा 50 मेट्रिक टन ऑक्‍सिजनचा पुरवठा कर्नाटक सरकारने रोखला आहे. कर्नाटकच्या बेल्लारीमधून कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ऑक्‍सिजनचा पुरवठा सुरु होता. पण कर्नाटक सरकारने तो आज बंद केला. सांगली जिल्ह्यातील ऑक्‍सिजन टॅंकर आज कर्नाटकमधून रिकामा परतला आहे.

सांगली जिल्ह्याला रोजची 43 टन ऑक्‍सिजनची सध्या गरज आहे. ऑक्‍सिजन अभावी रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.

दरम्यान, ऑक्‍सिजनचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून प्रयत्न सुरु असल्याची माहिती कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली. सध्या तरी यात राजकारण वाटत नाही. मात्र, केंद्राने लवकरात लवकर ऑक्‍सिजन पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी पाटील यांनी केली. त्याचबरोबर कोल्हापूरहून गोव्याला जाणारा ऑक्‍सिजन थांबवून तो कर्नाटकातून थेट गोव्याला पुरवण्याची मागणीही पाटील यांनी केली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.