वॉशिंग्टन, दि. 6– प्रसिद्ध उद्योजक आणि मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स आणि त्यांची पत्नी मेलिंडा गेट्स यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत त्यांनी संयुक्त पत्रक जारी करत दोघांची भूमिका स्पष्ट केली आहे. बिल गेटस यांनी त्यांच्या मालकीची कॅस्केड इनव्हेस्टमेंटस कंपनी आणि मेक्सिकोमधील दोन कंपन्या अशी संपत्ती मेलिंडा गेटस यांच्या नावावर केली असल्याची बातमी आहे. त्याचा अन्य तपशील अद्याप आला नसला तरी हा जगातला सगळ्यांत महागडा घटस्फोट ठरणार असल्याचे वृत्त काही विदेशी संस्थांनी दिले आहे.
बिल गेटस यांनी कॅस्केड इनव्हेस्टमेंटसची निर्मिती केली होती. कॅस्केडकडे रिअल इस्टेट, ऊर्जा, हॉटेल व्यवसाय याशिवाय इतर 12 कंपन्यांची मालकी होती. मार्कर या शेती क्षेत्रातील अवजारे मशीन निर्मिती करणाऱ्या कंपनीमध्ये 10 टक्के शेअर्स होते. त्याशिवाय रिपब्लिक सर्विसेस आयएनसी मध्ये देखील कॅस्केडची गुंतवणूक होती. बिल गेटस हे अमेरिकेतील सर्वात मोठे जमीनदार आहेत. वॉशिंग्टनच्या मेदिनामध्ये त्यांचं 66 हजार स्क्वेअर फूट क्षेत्रावर अलिशान निवासस्थान आहे. याशिवाय अमेरिकेतील पाच राज्यांत त्यांची निवासस्थाने असून अनेक कारही त्यांच्याकडे आहेत. बिल गेटस हे मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक आहेत. या कुटुंबाची एकूण मालमत्ता 130 अब्ज डॉलर असून ते जगातली चौथ्या क्रमांकाचे श्रीमंत कुटुंब आहे.
बिल गेट्स आणि मेलिंडा यांनी संयुक्त पत्रकात म्हटलं, आम्ही खूप विचाराअंती आणि आमच्या नात्यावर काम करुन अखेर घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. मागील 27 वर्षांच्या प्रवासात आम्ही 3 मुलांना वाढवलं आणि जगभरातील लोकांना एक आरोग्यदायी आणि अर्थपूर्ण आयुष्य जगण्यासाठी मदत करणारी संस्था उभी केली. आमचा त्या विचारांवर विश्वास आहे आणि म्हणूनच आम्ही घटस्फोटानंतरही ते काम करणं सुरुच ठेऊ.
भविष्यातही सोबत काम करणार असलो तरी उर्वरीत आयुष्यात आम्ही कपल म्हणून एकत्रित राहू शकत नाही. आम्ही एका नव्या आयुष्याला सुरुवात करत आहोत. त्यामुळे आम्हाला यासाठी अवकाश आणि खासगीपण द्यावं हीच विनंती, असंही बिल आणि मेलिंडा गेट्स यांनी आपल्या पत्रकात म्हटले आहे.