- ग्रामस्थांचा आरोप : ग्रुप ग्रामपंचायत उमरोलीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह;
- प्रकल्पग्रस्त मंगेश गायकर यांचा उपोषणाचा इशारा
कर्जत : तालुक्यातील उमरोली ग्रुप ग्रामपंचायत हद्दीत पाली भूतीवली धरण प्रकल्पग्रस्तांच्या मूलभूत सोयीसुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थांमध्ये कमालीचा असंतोष खदखदत असून, ग्रामपंचायतीने केलेल्या कामाबाबत ग्रामस्थ माहितीच्या अधिकारात माहिती मागत असून, देखील ही माहिती देण्यास ग्रामपंचायत टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे येथील प्रकल्पग्रस्त ग्रामस्थ मंगेश गायकर यांनी या विरोधात जाऊन अपिलात दाद मागण्याचा प्रयत्न केला. मात्र अपिलाच्या सुनावणीच्या तारखेच्या दिवशीही संबंधित अधिकारी गैरहजर राहणे आदी कारणे सांगत टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे त्रस्त झालेल्या गायकर यांनी अखेर या विरोधात उपोषणाचा इशारा निवेदनाद्वारे ग्रामपंचातीला दिला आहे.
पालीतर्फे वरेडी पुनर्वसन हस्तांतरण कागदपत्रे त्याची माहितीही 11 महिने उलटले तरी दिली गेली नाही. पाली पुनर्वसन जागेमधील पुनर्वसित ग्रामस्थांना दिलेल्या जागेमध्ये डिकसळ ग्रामस्थांनी केलेल्या अतिक्रमण दूर करण्याबाबत, लघु पाटबंधारे उपविभाग तालुका कर्जत जिल्हा रायगड प्रकल्पग्रस्तांच्या गावठाण जागेमध्ये केलेले अतिक्रमण आदी माहिती माहितीच्या अधिकारात मागिवली असता दिली गेलेली नाही आणि या विरोधात अपील केल्यावर अपिलाची सुनावणी तारीख देऊनसुद्धा सुनावणी घेतली गेली नाही तसेच पुढे कधी होणार याची माहिती पत्रक देत नाहीत.
त्यामुळे अखेर ग्रामस्थांच्या न्याय हक्कासाठी ग्रामस्थांच्या वतीने ग्रामस्थ मंगेश गायकर यांनी प्रजासत्ताक दिनी उमरोली कार्यालयासमोर उपोषण करण्याचे जाहीर केले आहे.
डिकसळ गरपोली परिसरात पर्यायी जागा
2002-03 या कालावधीत पाली भूतीवली धरण उभारण्यासाठी जागा संपादित केल्याने प्रकल्प ग्रस्तांना धरणापासून डिकसळ गरपोली परिसरात पर्यायी जागा देण्यात आली. मात्र त्यांच्या मूलभूत सोयीसुविंधाकडे ग्रामपंचायत दुर्लक्ष करीत असल्याचा प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
ग्रामपंचायतीकडे अर्ज तसेच माहिती अधिकार अर्ज करून सुद्धा माहिती मिळत नसून, टाळाटाळ करण्यात येत आहे. अपिल अधिकारी तथा विस्तार अधिकारी (ग्रामपंचायत, पंचायत समिती, कर्जत) यांच्याकडूनही याकामी दुर्लक्ष होत आहे. माहिती दडविण्यामागचे मागचे गौडबंगाल काय असा प्रश्न आम्हा प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांना पडला आहे. त्यामुळे नाईलाजाने माहिती मिळावी याकरिता उपोषण करावे लागत आहे.
– मंगेश गायकर, प्रकल्पग्रस्त, उपोषणकर्ते, पाली.काही कारणामुळे माहिती देण्यास विलंब झाला आहे, तर यापुढे माहिती देऊ.
– रामलाल चौधरी, ग्रामसेवक, ग्रुप ग्रामपंचायत उमरोली.