कर्जत-भीमाशंकर राष्ट्रीय महामार्गास हिरवा कंदिल

नारायणगाव -पुणे जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र भीमाशंकरच्या सर्वांगीण विकासासाठी भीमाशंकरला जाणारा मार्ग हा राष्ट्रीय दर्जाचा व्हावा यासाठी कर्जत-भीमाशंकर राष्ट्रीय महामार्गास केंद्राच्या रस्ता व राज्यमार्ग विभागाने हिरवा कंदिल दिला असल्याची माहिती खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिली.

डिसेंबर 2019 या महिन्यात झालेल्या संसदीय हिवाळी अधिवेशनात तीर्थक्षेत्र भीमाशंकरच्या सर्वांगीण विकासासाठी कर्जत-भीमाशंकर महामार्ग हा राष्ट्रीय दर्जाचा व्हावा, असे निवेदन 24 डिसेंबरला केंद्रीय भूपुष्ठ व रस्ता परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन खासदार कोल्हे यांनी दिले होते. या निवेदनाची दखल घेऊन मंत्री नितीन गडकरी यांनी रस्ता परिवहन व राजमार्ग विभागाला पुढील कारवाई साठी आदेश दिले आहेत.

तीर्थक्षेत्र भीमाशंकर हे भाविकांचे श्रद्धास्थान असून या ठिकाणी येण्यासाठी महामार्गची नितांत आवश्‍यकता आहे. राष्ट्रीय महामार्ग घोषित झाल्यामुळे या ठिकाणीच्या पर्यटनास निश्‍चितच चालना मिळेल. पर्यटनवृद्धीमुळे या भागातील रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. सोबतच मुंबईला जाण्यासाठी वेळेची बचत होईल. या राज्यमार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळावा अशी मागणी केली होती.

खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी केलेल्या मागणीला केंद्रिय मंत्रालयाने हिरवा कंदील दिला आहे. कर्जत-भीमाशंकर मार्ग हा राष्ट्रीय महामार्ग म्हणेन घोषित करण्यासाठी व तसेच यासंबंधी राज्यमार्ग मंत्रालय सचिव यांना कळविले आहे. महामार्गाच्या मजबुतीकरणासाठी लवकरच कार्यवाही करण्यात येईल असे लेखी पत्र डॉ. कोल्हे यांच्या कार्यालयास नुकतेच प्राप्त झाले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.