कारगिल विजय हे भारताच्या सामर्थ्याचे प्रतीक- मोदी

पाकिस्तानला दिला स्पष्ट संदेश

नवी दिल्ली- कारगिल विजय म्हणजे भारताच्या सामर्थ्याचे प्रतीक आहे. सशस्त्र दलांच्या समर्पणामुळे भारताची सुरक्षा नेहमीच अभेद्य राहील, असा ठाम विश्‍वास व्यक्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी अप्रत्यक्षपणे पाकिस्तानला स्पष्ट संदेश दिला. कारगिल विजयाला 20 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त येथे आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यात मोदी बोलत होते. कारगिलचे दु:साहस करून पाकिस्तानने 1999 मध्ये सीमांची फेरआखणी करण्याचा प्रयत्न केला.

मात्र, भारतीय सुरक्षा दलांनी नापाक मनसुबे उधळून लावले. कारगिल विजय संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी आहे. युद्ध सुरू असताना मी कारगिलला भेट दिली. ती भूमी माझ्यासाठी तीर्थक्षेत्रासारखीच आहे, असे ते म्हणाले. काही देश दहशतवादाचा फैलाव करण्यासाठी छुप्या युद्धाचा आधार घेत आहेत. त्याचा मुकाबला करण्यासाठी जागतिक समुदायाने एकत्रितपणे प्रयत्न करण्याची वेळ आली आहे.

राष्ट्रीय सुरक्षेचा विषय असेल तेव्हा भारत कुणाच्या दबावाखाली किंवा प्रभावाखाली कार्य करणार नाही. समुद्र असो की अवकाश; भारताच्या हितरक्षणाचा संबंध येईल तिथे आम्ही आमच्या सामर्थ्याचा वापर करू. देश सुरक्षित असेल तरच विकास शक्‍य आहे, असे भूमिका त्यांनी मांडली. सशस्त्र दलांच्या आधुनिकीकरणाचा विषय आमच्या प्राधान्यक्रमावर आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.