-24 तासांत वाढले पावणेतीन टीएमसी पाणी
-टेमघर धरण परिसरात सर्वाधिक पाऊस
-खडकवासला धरण भरण्याच्या मार्गावर
पुणे – खडकवासला प्रकल्पात गेल्या 24 तासांत दमदार पाऊस झाला आहे. त्यामुळे धरणातील साठ्यात तब्बल पावणेतीन टीएमसी पाणी वाढले असून धरणसाखळीचा पाणीसाठा शनिवारी सायंकाळी 18.10 टीएमसीवर पोहचला आहे.
धरणसाखळीतील खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या धरणांत शुक्रवारी सायंकाळी 5 वाजता 15.39 टीएमसी पाणीसाठा होता. या 24 तासांत सर्वाधिक तब्बल 210 मिमी पाऊस टेमघरच्या पाणलोट क्षेत्रात झालेला आहे. तर अवघ्या तीन दिवसांपूर्वी 50 टक्के पाणीसाठा असलेले खडकवासला धरण दुसऱ्यांदा भरण्याच्या मार्गावर आहे.
मागील आठवड्यात या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र, गुरुवारपासून पुन्हा तुरळक पावसाला सुरुवात झाली. शुक्रवारी सकाळी मध्यम पाऊस झाल्यानंतर शुक्रवारी दुपारनंतर पावसाचा जोर चांगलाच वाढला, तर शुक्रवारी रात्री आणि शनिवारी पहाटे मुसळधार पाऊस झाला. परिणामी, शनिवारी सकाळी पाणीसाठा 16.47 टीएमसीवर पोहचला. तर शनिवारी दिवसभरही पावसाचा जोर कायम राहिल्याने धरणसाखळीतील साठ्याचे प्रमाण 62.11 टक्के झाले होते.
पानशेत, वरसगाव परिसरातही दमदार
पाटबंधारे विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत सर्वाधिक 210 मिमी पाऊस टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झाला आहे. तर, पानशेत धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही तेवढाच पाऊस झाला असून, वरसगाव धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 197 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर खडकवासला धरणात सुमारे 96 मिमी पाऊस झाला आहे. दरम्यान, या पावसामुळे या चारही धरणांत मोठ्या प्रमाणात ओढे तसेच इतर जलस्रोतांमधून मोठ्या प्रमाणात पाणी येत असल्याने शनिवारी सायंकाळी पावसाचा जोर कमी झाला असला, तरी साठ्यात वाढ सुरूच आहे.