थकबाकीबरोबर वीजचोऱ्यांमध्येही कराड तालुका अव्वल

कराड  – महावितरणने राज्यातील जवळपास सर्व गावे प्रकाशमान केली असली तरी वीजचोऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यात कंपनीची यंत्रणा कमी पडत आहे. आपल्याला ज्या सुविधा उपलब्ध होतात, त्याची किंमत प्रत्येकाने मोजलीच पाहिजे. मात्र, महावितरणकडून पुरवण्यात येणाऱ्या सेवेचे अनेकांना गांभीर्यच नसते. कराड तालुक्‍यात तब्बल पाच कोटींची वीज बिले थकीत असून तालुक्‍यात, विशेषत: उंडाळे भागात मोठ्या प्रमाणात वीज चोरी होत आहे.

त्याकडे महावितरणच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आहे. मात्र, प्रामाणिकपणे वीज बिले भरणाऱ्या नागरिकांना त्याचा फटका बसत आहे. खेडोपाडी वीज पोहोचल्याने घरोघरी मोबाइल, टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन, आटाचक्‍की, अशी उपकरणे, साधनेही वाढली आहेत. या वस्तू आता चैनीच्या नव्हे तर गरजेच्या ठरल्या आहेत. ज्या प्रमाणात या उपकरणांचा वापर केला जातो, त्या प्रमाणात वीज बिलेही येतात. ती वेळेत भरणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. नागरिकही ते गांभीर्याने घेत नाहीत.

महावितरणचे अधिकारी, कर्मचारीही कठोर पावले उचलत नसल्याने तालुक्‍यातील थकीत बिलांचा आकडा साडेपाच कोटींवर गेला आहे. वीज वितरणने ग्राहकांच्या सोयीसाठी वीज बिल भरणा केंद्रे व डिजिटल पेमेंटचीही सोय केली आहे. ग्रामीण भागापेक्षा शहरांमध्ये विजेवर चालणाऱ्या घरगुती उपकरणांचा जास्त वापर होत असल्याने तेथील बिलांचा आकडा मोठा असतो. ग्रामीण भागातील लोक शेतीच्या कामानिमित्त बाहेर असतात. त्यामुळे त्यांचा वीज वापर मर्यादित असल्याने बिलांचा आकडाही कमी असतो, तरीही वीज बिले कमीत कमी यावीत म्हणून अनेक जण खटाटोप करतात.

उंडाळे भागातील अनेक गावांमध्ये जुनेच मीटर असल्याने वीजचोरी करणे सुलभ होते. त्यामुळे तेथे सर्रास वीजचोरी होत आहे. महावितरणकडून दरमहा विशिष्ट तारखेला मीटर रीडिंग घेतले जाते. त्या तारखेला वीजचोरी होत नाही. तो दिवस वगळता इतर दिवशी वीजचोरी केली जाते. मीटर रीडिंगचे काम कंत्राटदारांकडे असल्याने त्यांना वीज बिलांशी काहीही देणेघेणे नसते; परंतु महावितरणच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी वीजचोरी रोखण्यासाठी दक्ष असले पाहिजे. तालुक्‍यातील वीजचोरी रोखण्यासाठी गावोगावी धडक मोहीम राबवणे गरजेचे आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.