“येळकोट येळकोट’च्या गजरात खंडोबाचा रथोत्सव उत्साहात  

गोंदवले – “येळकोट येळकोट जय मल्हार’, “लक्ष्मीआईच्या नावानं चांगभलं’च्या जयघोषात, भंडारा, खोबऱ्याच्या उधळणीत व भक्‍तांच्या अलोट गर्दीत मलवडी, ता. माण येथील श्री खंडोबाचा रथोत्सव उत्साहा झाला. मोक्षदा एकादशीच्या शुभमुहूर्तावर येथील श्री खंडोबाचा वार्षिक रथोत्सव होतो. या रथोत्सवात आज सकाळपासूनच श्रींच्या दर्शनासाठी भक्तांनी गर्दी केली होती. देवस्थानने दर्शनरांगेची व्यवस्था केल्याने गडबड झाली नाही.

दुपारी बारा वाजल्यानंतर धुपारती झाल्यावर श्रींचे मुखवटे मानकरी, सालकरी, पुजारी, वाघे यांच्या उपस्थितीत रथावर नेण्यात आले. मुखवटे नेण्याचा भक्‍तिरसाने भरलेला सोहळा अनुभवण्यासाठी प्रत्येक जण धडपडत असतो. मुखवटे नेताना भाविकांनी जल्लोष केला. मंदिराच्या समोरच्या सज्जावरून भंडाऱ्याची करण्यात आली. श्रींचे मुखवटे (प्रतिमा) रथात नेल्यावर जुन्या पंचदशनाम आखाड्याचे महंत श्री शांतिगिरी महाराजांच्या हस्ते प्रतिमा व रथपूजन करण्यात आले.
श्रींची आरती झाल्यावर रथाची ग्रामप्रदक्षिणा सुरू झाली.

काही अंतर गेल्यावर श्री महालक्ष्मीचा रथ ग्रामप्रदक्षिणेत सहभागी झाला. देवाची घोडी, सनई-हलगीचे ताफे व वाद्यवृंदाच्या सहभागामुळे ग्रामप्रदक्षिणेत उत्साह संचारला होता. निढळ, नवलेवाडी व मलवडी येथील सासनकाठ्या नाचविण्यासाठी तरुणांमध्ये चढाओढ सुरू होती. दोन्ही रथांवर भक्‍तिभावाने देणग्या अर्पण करण्यात आल्या. संपूर्ण गावासह माणगंगेच्या पात्रातून रथांची प्रदक्षिणा सायंकाळी पूर्ण झाली. रथांबरोबरच मंदिरामध्येही दर्शनासाठी व देणग्या देण्यासाठी भक्‍तांनी गर्दी केली होती. मेवामिठाईची दुकाने, खेळण्यांची दुकाने यात्रा सजली आहे. बालगोपाळांचे आकर्षण असलेल्या पाळण्यांमध्ये बसण्यासाठी गर्दी होत होती. श्री मल्हारी म्हाळसाकांत देवस्थान ट्रस्ट, मलवडी ग्रामपंचायत व पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी रथोत्सवाचे नेटके नियोजन केले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)