मुंबई – बॉलीवूड अभिनेत्री कंगना रणावतला दिलासा देण्यास दिंडोशी सत्र न्यायालयाने नकार दिला आहे. अंधेरी दंडाधिकारी कोर्टात जावेद अख्तर यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्याला स्थगिती देण्यास नकार देत कंगनाची याचिका फेटाळून लावण्यात आली. जावेद अख्तर यांनी अंधेरी कोर्टात कंगनाविरोधात मानहानीचा दावा ठोकला आहे. शनिवारी कंगनाच्या अर्जावर सुनावणी पूर्ण करत न्यायाधीश एस.यु बगाले यांनी आपला निकाल राखून ठेवला होता.
गीतकार जावेद अख्तर यांनी दाखल केलेल्या अब्रुनुकसान प्रकरणी अंधेरी महानगर दंडाधिकारी न्यायालयाने कंगनाला नुकताच जामीन मंजूर केला आहे. कंगानाने काही दिवसांपूर्वी कोर्टापुढे प्रत्यक्ष हजर राहात या प्रकरणी बजावण्यात आलेला वॉरंट रद्द करून घेतला होता. मुंबई सत्र न्यायालयाने दिलासा नाकरल्याने आता कंगनापुढे हायकोर्टात दाद मागण्याचा पर्याय शिल्लक आहे.