एस. बालन करंडक : जीएसटी अँड कस्टम संघाला विजेतेपद

पुणे– स्पोर्टसफिल्ड मॅनेजमेंट तर्फे आयोजित दुसऱ्या एस. बालन करंडक अजिंक्‍यपद टी-20 क्रिकेट स्पर्धेत ओम भोसले याने केलेल्या नाबाद 62 धावांच्या जोरावर जीएसटी अँड कस्टम संघाने सेंच्युरी क्रिकेट क्‍लब संघाचा 86 धावांनी पराभव करत स्पर्धेचे विजेतेपद संपादन केले.

मुंढवा येथील लिजंडस्‌ स्पोर्टस्‌ क्‍लब मैदानावर झालेल्या स्पर्धेच्या अंतिम फेरीच्या सामन्यात धावांचा पाऊस पडला. जीएसटी अँड कस्टम संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना 20 षटकात 4 गडी गमावून 199 धावांचा डोंगर उभा केला. संघाने पहिल्यांपासूनच सावध सुरुवात केली. तुशार श्रीवास्तव (47 धावा) व रोहन मारवा (30 धावा) या सलामीवीरांनी 54 चेंडूत 75 धावांची भागिदारी करून मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. त्यानंतर फलंदाजीस आलेल्या ओम भोसले याने 31 चेंडूत 3 चौकार व 5 षटकारांसह नाबाद 62 धावा चोपल्या. धीरज फटांगरे यानेही 24 चेंडूत 4 चौकार व 2 षटकारांसह 44 धावा कुटल्या. या दोघांनी चौथ्या गड्यासाठी 54 चेंडूत 111 धावांची भागिदारी केली व संघाला 199 धावा संख्या उभी करून दिली.

मोठी धावसंख्या आणि षटकामागील सरासरी गती यांचा ताळमेळ ठेवण्याच्या नादात सेंच्युरी क्रिकेट क्‍लबचे फलंदाज ठराविक अंतराने बाद होत गेले. यश नहार 36 धावा व ओंकार आखाडे 16 धावा यांच्या प्रतिकारानंतर संघाचा डाव 18.1 षटकात व 113 धावांवर आटोपला. जीएसटी संघाच्या अक्षय करनेवर याने 19 धावा 4 गडी टिपत संघाचा विजय सोपा केला.

विजेत्या जीएसटी अँड कस्टम संघाला 51 हजार रुपये व करंडक तर, उपविजेत्या सेंच्युरी क्रिकेट क्‍लब संघाला 41 हजार रूपये व करंडक देण्यात आला. तिसऱ्या क्रमांक पटकावणार्या द गेम चेंजर्स संघाला 31 हजार रुपये आणि करंडक असे पारितोषिक देण्यात आले.

मालिकेचा सर्वोत्कृष्ट खेळाडूचा मान नौशाद शेख (153 धावा व 7 बळी) याला, सर्वोत्कृष्ट फलंदाजाचा मान अर्थव काळे (210 धावा), सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचा मान अक्षय करनेवर (10 बळी) आणि सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा मान पवन शहा यांना मिळाला. या विजेत्यांना प्रत्येकी पाच हजार रुपये आणि सन्मानचिन्ह देण्यात आले. फेअर प्ले संघाचे पारितोषिक ईगल्स्‌ क्रिकेट क्‍लबला मिळाले.

स्पर्धेचे पारितोषिक वितरण लिजेंडस्‌ स्पोर्टस्‌ क्‍लबचे संचालक संदीपदादा कोद्रे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्पोट्‌सफिल्ड मॅनेजमेंटचे सनी मारवाडी, संतोष शहा, सोहम आगाशे आदि मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभय जाजू यांनी केले.

संक्षिप्त धावफलक –

अंतिम फेरी : जीएसटी अँड कस्टम संघ ः 20 षटकात 4 बाद 199 धावा. (ओम भोसले नाबाद 62, तुशार श्रीवास्तव 47, धीरज फटांगरे 44, रोहन मारवा 30, प्रथमेश पाटील 2-38) वि. वि. सेंच्युरी क्रिकेट क्‍लब ः 18.1 षटकात सर्वबाद 113 धावा. (यश नहार 36, ओंकार आखाडे 16, अक्षय करनेवर 4-19, अक्षय वाईकर 2-22). सामनावीर ः ओम भोसले.

तिसऱ्या स्थानासाठी : द गेम चेंजर्स ः 20 षटकात सर्वबाद 157 धावा. (नौशाद शेख 38, अतिफ सय्यद 34, अतुल वीटकर 22, ऍलन रॉड्रीक्‍स्‌ 5-26, सचिन भोसले 2-23) वि. वि. किंग्ज्‌ स्पोर्टस्‌ क्‍लब ः 20 षटकात 9 बाद 145 धावा. (अर्थव काळे 40, अजित गव्हाणे 22, मिझान सय्यद 32, नौशाद शेख 3-19, प्रज्वल गुंड 2-32). सामनावीरः नौशाद शेख.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.