ठेकेदाराकडून घेतले 40 हजार ः सावकारकीचा गुन्हा
शिक्रापूर (वार्ताहर) – कान्हूर मेसाई (ता. शिरूर) ग्रामपं-चायतीच्या केलेल्या कामाचे बिल काढून देण्यासाठी काम करणाऱ्या ठेकेदारास 70 हजार रुपये लाचेची मागणी करीत 40 हजार रुपये लाच घेणाऱ्या ग्रामविकास अधिकाऱ्यास लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडून अटक केली आहे.
गंगाराम सदाशिव शेलार (रा. हडपसर, पुणे) असे या लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे. गंगाराम शेलार यांना यापूर्वी घोरपडी पुणे येथे लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी एक हजार पाचशे रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडून त्यांच्यावर कारवाई केलेली आहे. तसेच यापूर्वी बेकायदेशीर सावकारी केल्यामुळे त्यांच्यावर यापूर्वी शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यानंतर शिरूर तालुक्यात कार्यरत असताना कान्हूर मेसाई ग्रामपंचायतीच्या केलेल्या कामांची बिले काढण्यासाठी गंगाराम शेलार ठेकेदारास कामाचे सात लाख सत्तर हजार रुपये बिल काढून देण्यासाठी काही रकमेची मागणी करत होते. त्यामुळे या ठेकेदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.
या विभागाचे पोलीस निरीक्षक सुनील क्षीरसागर, सहायक उपनिरीक्षक सुनील शेळके, महिला पोलीस तुपे यांच्या पथकाने शिक्रापूर येथे येत चाकण चौकातील साईकृपा हॉटेलजवळ सापळा लावला. यावेळी तक्रारदार ठेकेदाराने लाच मागणाऱ्या ग्रामविकास अधिकाऱ्यास चर्चा करून 40 हजार रुपये देण्याचे कबूल केले. रक्कम स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ग्रामविकास अधिकारी गंगाराम शेलार यास रंगेहाथ ताब्यात घेत, शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.
जिल्हा परिषदेचे अधिकारी लक्ष देणार का ?
शिक्रापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केलेले ग्रामविकास अधिकारी गंगाराम शेलार यांच्यावर यापूर्वी बेकायदेशीर सावकारीचे गुन्हे दाखल झालेले असून लाच घेताना दोन वेळा अटक करण्यात आलेली आहे. आज देखील हे अधिकारी बेकायदेशीर कामे करत आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेचे अधिकारी याकडे लक्ष देणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पोलिसांना देत होता गुंगारा
गंगाराम शेलार यांच्यावर यापूर्वी बेकायदेशीर सावकारी प्रकरणी गुन्हे दाखल झाल्यानंतर शेलार यांनी न्यायालयाकडे अटकपूर्व जामीन साठी अर्ज केले होते; परंतु न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर देखील अनेक दिवस गंगाराम शेलार हे शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना गुंगारा देत पोबारा करत होते.