मुंबई – ‘द केरळ स्टोरी’ चित्रपटाला मोठा विरोध झाला होता. मात्र तरी देखील या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली आहे. अनेक ठिकाणी या चित्रपटावर बंदी घालण्यात आली होती. या चित्रपटावर आता अभिनेता कमल हसन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ‘द केरळ स्टोरी’ हा प्रोपगंडा चित्रपट असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे सध्या त्यांचे विधान चांगलेच चर्चेत आले आहे.
कमल हसन अबुधाबीमध्ये आयफामध्ये सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांनी ‘द केरळ स्टोरी’वर मत मांडले. कमल हसन म्हणाले की, ‘मी तुम्हाला सांगितले की हा चित्रपट एक प्रोपगंडा चित्रपट आहे, ज्याच्या मी विरोधात आहे. जेव्हा सत्य कथा लिहिली जाते, तेव्हा ते खरे असले पाहिजे. या चित्रपटामध्ये दाखविण्यात आलेल्या घटना खऱ्या नाहीत.’ यावेळी कमल हसन यांनी प्रोपगंडा चित्रपटांच्या विरोधात असल्याचे स्पष्टपणे सांगितले.
दरम्यान, ‘द केरळ स्टोरी’ चित्रपटावर तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात चित्रपट निर्मात्यांनी थेट कोर्टात धाव घेतली. यानंतर कोर्टाने मोठा निर्णय देत द केरळ स्टोरी चित्रपटावरील बंदी मागील आठवड्यात उठवली. 5 मे रोजी प्रदर्शित झालेल्या ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाने एका महिन्याच्या आतच 200 कोटींहून अधिक कमाई केली आहे. हा चित्रपट केवळ 15 ते 20 कोटींच्या बजेटमध्ये तयार झाला होता.