Kalkaji Temple : दिल्लीतील नेहरू प्लेस येथील कालकाजी मंदिर संकुलात गायक बी प्राक यांच्या कार्यक्रमादरम्यान स्टेज कोसळल्याचे धक्कादायक घटना समोर आली आहे. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला, तर 17 जण जखमी झाले. स्टेज कोसळल्यानंतर मंदिर परिसरात चेंगराचेंगरी झाली. जागरण कार्यक्रमात जवळपास 1600 लोक उपस्थित होते असे सांगण्यात येत आहे.
कालकाजी मंदिराच्या महंत आवारात जागरण होत होते. यावेळी गायक बी प्राक परफॉर्म करत होते. मंचावर मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. त्यामुळे लाकूड व लोखंडी चौकटीने बनविलेले स्टेज तुटले. स्टेज कोसळल्याने 17 जण गंभीर जखमी झाले असून एका महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
वृत्तानुसार कालकाजी मंदिर परिसरात आयोजित केलेल्या जागरणाला पोलिसांकडून परवानगी देण्यात आली नव्हती. मात्र, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पुरेसा जवान तैनात करण्यात आला होता. घटना घडली त्यावेळी जागरणमध्ये सुमारे 1500 ते 1600 लोकांचा जमाव होता.
एफआयआर नोंदवला
घटनेची माहिती मिळताच दिल्ली पोलिसांच्या गुन्हे पथकाने घटनास्थळी भेट दिली. मिळालेल्या माहितीनुसार, रुग्णालयात दाखल इतर सर्व जखमींची प्रकृती स्थिर आहे. तर काहींची हाडं फ्रॅक्चर झाल्याची माहिती आहे. सध्या पोलीस ठाण्यात आयोजकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिल्ली पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
मृत महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही
या प्रकरणातील ताजी माहिती अशी की, काल रात्री दिल्लीतील कालकाजी मंदिरातील जागरण दरम्यान स्टेज कोसळल्याने आतापर्यंत १७ जण जखमी झाले आहेत. सर्वांवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुमारे 45 वर्षांच्या महिलेला मॅक्स रुग्णालयात दाखल करण्यात आले, तिला डॉक्टरांनी तत्काळ मृत घोषित केले. मृत महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही. दोन जणांनी मृत महिलेला ऑटोमधून रुग्णालयात नेले. मृतांची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.