मार्गावर चार टप्प्यात झालेला खर्च
काळेवाडी फाटा ते चिंचवड पूल – 38 कोटी
चिंचवड पूल ते पवना नदी – 21 कोटी 13 लाख
एम्पायर इस्टेट उड्डाणपूल – 121 कोटी 85 लाख
पवना नदी ते केएसबी चौक – 48 कोटी 84 लाख
केएसीबी चौक ते देहू आळंदी रस्ता – 50 कोटी 15 लाख
पिंपरी – काळेवाडी फाटा ते देहू आळंदी या बीआरटीएस मार्गाला तब्बल नऊ वर्षांनी मुहूर्त लागणार आहे. चौथ्या टप्प्याचे काम पूर्ण झाल्यामुळे लवकरच या मार्गावरुन बस धावणार असून, प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने विकसित करण्यात येत असलेला काळेवाडी फाटा ते देहू – आळंदी रस्ता बीआरटीएस मार्ग 10.250 किलोमीटर लांबीचा आहे. तर, 45 मीटर रुंद आहे.
या मार्गाचे पाच टप्प्यात विभाजन करण्यात आले आहे. काळेवाडी फाटा ते एमएम शाळा, एमएम शाळा ते विजयनगर (पवना नदी), पवना नदी ते ऑटो क्लस्टर या मार्गाचे काम पूर्ण झाले आहे. पवना नदी ते केएसबी चौक हा मार्ग पूर्ण करण्यासाठी जागेची अडचण निर्माण झाली आहे. केएसबी चौक ते चिखली देहू आळंदी रस्ता असे पाच टप्पे करण्यात आले होते. 2011 पासून या मार्गाचे काम सुरु होते.
चौथ्या टप्प्याचे काम पूर्ण झाल्यानंतर आता या मार्गावर बीआरटी बस धावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. काळेवाडी फाटा ते देहू आळंदी रस्ता हा 10.250 किलोमीटर लांबीचा हा मार्ग आहे. या मार्गाचे पाच टप्प्यात विभाजन करून काम पूर्ण करण्यात आले आहे. या नवीन मार्गाचा फायदा औद्योगिक क्षेत्रातील कामगारांना होणार असून, रोज सुमारे एक लाख प्रवासी या बससेवेचा वापर करतील, असा महापालिका प्रशासनाचा अंदाज आहे.
काळेवाडी फाटा ते देहू आळंदी रस्ता या बीआरटीएस मार्गावर एकूण 17 बस थांबे असणार आहेत. या सर्व बस थांब्याचे काम पूर्ण झाले आहे. जागा हस्तांतरण करण्यासाठी अधिकचा वेळ खर्ची पडल्याने काळेवाडी फाटा ते देहू आळंदी रस्ता हा बीआरटीएस मार्ग लांबणीवर पडला होता. मात्र आता या मार्गाचे काम पूर्ण झाले असून, पीएमपी प्रशासनाकडून 10 बस देखील उपलब्ध झाल्या आहेत.
– विजय भोजने, प्रवक्ता, बीआरटीएस, पिंपरी-चिंचवड महापालिका.