श्रीक्षेत्र भीमाशंकरची कळमजाई देवी ही पुरातन काळामध्ये ‘श्री कालमाध्वशक्तीपीठ’ या नावाने ओळखली जात होती. येथे आल्यावर पायऱ्यांच्या अलीकडे सुरुवातीला उजव्या बाजूला कळमजाईचे मंदिर आहे. हे देवीचे जागृत देवस्थान असून भीमाशंकर येथे आल्यावर शिवलिंगाच्या दर्शनाप्रमाणेच कळमजाईचे दर्शन घेतल्याशिवाय श्री क्षेत्र भीमाशंकरचे दर्शन पूर्ण होत नाही, त्यामुळे या देवीच्या दर्शनाला विशेष महत्त्व आहे.
सह्याद्रीच्या पर्वतरागांमध्ये कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची भवानी, माहूरची रेणुकादेवी ही पूर्ण शक्तिपीठे आहेत. त्यातील एक अर्धपीठ भीमाशंकरची कळमजाई देवी असल्याचे म्हटले जाते. श्रीक्षेत्र भीमाशंकर व कळमजादेवी यांच्याबाबत आख्या यिका सांगितली जाते की, त्रेतायुगात गहन तपश्चर्या करून त्रिपुरासुराने भगवान शंक राला प्रसन्न करून घेतले व माझे मरण पुरुष किंवा स्त्रीच्या हातून होणार नाही, असा वर मागून घेतला. नंतर त्याने संपूर्ण पृथ्वीवर हाहाकार माजविला, स्वर्गावरही विजय मिळविला. त्याच्या अत्याचाराला कंटाळून देव-देवतांनी शंकराकडे धाव घेतली.
त्यावेळी अर्धनारी नटेश्वराचे रूप घेऊन त्रिपुरासुराचा वध करण्याचे ठरले. त्यासाठी त्यांनी ब्रह्मदेवाला शक्तीची म्हणजेच पार्वतीची आराधना करण्यास सांगितले. आपल्या गहन तपश्चर्येने पार्वतीला प्रसन्न करून शंकरामध्ये सामावण्याची विनंती केली. भगवान शंकर व पार्वती एकत्र होऊन अर्धनारी नटेश्वराचे रौद्र रूप धारण केले. हे रूप पाहून त्रिपुरासूर घाबरला व त्रिपुरासुराचा वध झाला. भीमाशंकर येथील भीमाशंकरची कळमजाई देवी. पिंडीच्या कडेला हळदकुंकू वाहिले जाते. रानकमळ (शेंदी) चे फुल हे शिवलिंगावर कळमजाईदेवीला वाहिले जाते.
मात्र फक्त भीमाशंकर येथेच पवित्र शिवलिंग अर्धनारी नटेश्वराप्रमाणे दोन भागात आहेत. त्यामुळे लिंगाच्या उजव्या भागावर हळद-कुंकू वाहिले जाते व डाव्या बाजूला भस्म लावला जातो. म्हणून प्रत्येक शंकराच्या मंदिरात शंकराच्या पिंडीची पूजा करताना शिवलिंगावर हळदकुंकू वाहिले जात नाही, तर पिंडीच्या कडेला हळदकुंकू वाहिले जाते. याचे कारण म्हणजे पिंडीवरील लिंग शिव आहे तर, पिंड म्हणजे पार्वतीचे पाय आहेत.
वर्षातून दोन वेळा शिव व पार्वतीची भेट
श्रीक्षेत्र भीमाशंकर पवित्र शिवलिंगासमोर देवीची मूर्ती आहे. नवरात्रामध्ये मोठा उत्सव साजरा केला जातो. होमहवनाबरोबरच सप्ताह, अन्नदान, मंत्रपठण केले जाते. वर्षातून दोनवेळा शिव व पार्वतीची भेट भीमाशंकर येथे घातली जाते. त्यापैकी एक नवरात्रात कार्यक्रम होतो. पूजा-अर्चा करण्याचा मान हा लोहकरे कुंटुबीयांचा आहे, अशी माहिती भीमाशंकरचे विश्वस्थ रत्नाकर कोडीलकरव कळमजाई देवस्थानचे उपाध्यक्ष शांताराम लोहकरे यांनी सांगितले आहे.
सत्यजीत गाडे