– बाळासाहेब वाबळे
काऱ्हाटी – क्रिक्रेट खेळाप्रमाणेच अन्य खेळांनाही महत्त्व यावे, त्या खेळांची गोडी वाढावी. याकरीता आधुनिक पद्धतीने अशा खेळांचे अयोजन करण्यात येत आहे. यामध्ये प्रो-कबड्डीचा समावेश असला तरी बारामती तालुक्यातील फोंडवाडा येथे गेल्या 39 वर्षांपासून कबड्डीचे भव्यदिव्य सामने भरविले जात असून महाराष्ट्रात या स्पर्धेची चर्चा असते. यावर्षीही येथे
स्पर्धेचे अयोजन करण्यात आल्याने कबड्डी…कबड्डीचा दम घुमत होता.
बारामती तालुक्यातील फोंडवाडा गावात पुणे जिल्हा कुस्ती असोसिएशनच्या मान्यतेने कबड्डी स्पर्धांचे 39 वर्षांपासून आयोजन करण्यात येत आहे. हनुमान उत्सवानिमित्त या स्पर्धेचे अयोजन दरवर्षी केले जाते. 500 लोकसंख्या असलेल्या गावातील राजे शिवछत्रपती ग्रामविकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून कबड्डी स्पर्धेची ही परंपरा जपली गेली असून पंचक्रोशीतील खेळाडूंना एक हक्काचे व्यासपीठ या माध्यमातून या प्रतिष्ठानने उपलब्ध करून दिले आहे. यावर्षीही या स्पर्धेत अयोजन करण्यात आल्यानंतर चार जिल्ह्यातील तब्बल 60 संघ मैदाना उतरले. यामुळे पंचक्रोशीत गेली काही दिवस कबड्डी, कबड्डीचा आवाज घुमत होता. स्पर्धेत प्रथम क्रमांक तावशी येथील भैरवनाथ कबड्डी संघाने पटकावला.
हनुमान उत्सवानिमित्त सकाळी बजरंग देवाची विधिवत पूजा करून दिवस-रात्र पंचक्रोशीतील भजनी मंडळांचेही कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. कबड्डी स्पर्धेचा शुभारंभ बारामती तालुका कृषी उत्पन्न समितीच्या उपसभापती शशिकला वाबळे यांच्या उपस्थित झाला. यावेळी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, दूध संघाचे अध्यक्ष संदीप जगताप, दिलीप जगताप, वसंतराव लडकत, अंकुश रसाळ, उद्योजक संजय वाबळे उपस्थित होते. स्वागत सतीश पिसाळ यांनी केले. प्रस्ताविक आर. एम. पिसाळ यांनी केल. सूत्रसंचालन अतुल पिसाळ यांनी केले. राजेंद्र पिसाळ यांनी आभार मानले.