सातारा – महाराष्ट्रात गाजलेल्या वाई हत्याकांड प्रकरणात माफीचा साक्षीदार बनलेल्या ज्योती मांढरेला जिल्हा न्यायालयाने एक वर्षासाठी जामीन मंजूर केला. वैद्यकीय कारणासाठी हा जामीन मिळाल्याने सांगण्यात आले. वाई तालुक्यातील संतोष पोळने सहा जणांचा खून केला होता. वाई पोलिसांनी हे प्रकरण उघडकीस आणल्यानंतर एकच खळबळ उडाली होती.
या हत्याकांडप्रकरणी संतोष पोळ तसेच ज्योती मांढरेला अटक करण्यात आली होती. याप्रकरणी सातारा जिल्हा न्यायालयात खटला सुरु आहे. यामध्ये ज्योती मांढरे माफीची साक्षीदार बनली आहे. मागील काही वर्षांपासून माफीचा साक्षीदार बनलेली ज्योती मांढरे कारागृहात आहे. वैद्यकीय कारणासाठी मांढरेने जामीनासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज केला होता.
हा अर्ज मंजूर करण्यात आला आहे. न्यायालयाने एक वर्षासाठी 15 हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर हा जामीन मंजूर केला आहे. यापूर्वीही मांढरेला एक महिन्यासाठी जामीन मिळाला होता. मांढरेला जामीन मिळाला असला तरी जिल्हा सोडून जाऊ नये, असा आदेशही न्यायालयाने दिला आहे. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त विशेष सरकारी वकील ऍड. मिलींद ओक यांनी बाजू मांडली. माफीचा साक्षीदार बनलेल्या ज्योती मांढरेचा आजार खरा आहे. सरकार त्यांना संरक्षण देण्यास सक्षम आहे. त्यामुळे त्यांना जामीन देण्यास हरकत नाही, असे ऍड. ओक यांनी बाजू मांडताना सांगितले होते.