नांदेड – भारतीय न्याय व्यवस्थेत अत्यंत संथ गतीने न्याय मिळतो अशी ओरड नेहमीच होत असते. कित्येक प्रकरणी वर्षानुवर्षे चालतात. मात्र मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यात अवघ्या ६४ दिवसांत संपूर्ण न्यायालयीन प्रक्रिया पार पडून आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि तिचा खून केल्याप्रकरणी अवघ्या ६४ दिवसात न्यायालयाने सदर गुन्ह्यातील आरोपीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा दिली आहे. नांदेड जिल्ह्यातील ही घटना असून, ६४ दिवसात पीडित मुलीच्या कुटुंबियांना न्याय मिळाला आहे. पीडित मुलगी ५ वर्षाची होती. आरोपीने पीडित मुलीला पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार केले होते. एवढच नव्हे तर तिचा खून देखील केला होता. या प्रकरणी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पोक्सो) नुसार आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
२० जानेवारी २०२१ रोजी नांदेड जिल्ह्यातील दिवशी येथे ही घडली होती. पोलिसांनी या प्रकरणात अवघ्या १९ दिवसात तातडीने तपास पूर्ण करुन दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. सालगड्याने आपल्याच शेतमालकांच्या पाच वर्षीय मुलीवर अत्याचार करुन तिची हत्या केली होती हे पोलिसांनी केलेल्या तपासात निष्पन्न झाले होते. बाबूराव सांगेराव असं शिक्षा झालेल्या गुन्हेगाराचं नाव आहे.
भोकर जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालयात हा खटला चालवण्यात आला होता. सबळ पुराव्यांवरुन आरोपीविरुद्धचा गुन्हा सिद्ध झाला असून, जिल्हा न्यायाधीश मुजीब एस शेख यांनी नराधम आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली.