मलठण, (वार्ताहर)- ‘शाळा-महाविद्यालये तसेच सार्वजनिक ठिकाणी मुली व महिलांना कुणी त्रास दिला तर तात्काळ दौंड पोलिसांशी संपर्क साधावा. टुकारगिरी करणाऱ्यांना वठणीवर आणू, असा इशारा पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिला. यावेळी त्यांनी सर्व शिक्षकांशी सविस्तर चर्चा करीत अडचणी जाणून घेत सूचना केल्या.
दौंड येथील पोलीस ठाण्यात मुली-महिलांच्या सुरक्षेसाठी आणि त्यांना निर्भय करण्यासाठी पोलीस निरीक्षक यादव यांनी दौंड हद्दीतील सर्व शाळा-महाविद्यालयाच्या प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षकांची दौंडच्या पोलीस ठाण्यात बैठक घेऊन सुरक्षिततेविषयी धडे दिले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी पालक, शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी पोलीस निरीक्षकांनी घेतलेल्या भूमिकेचे स्वागत होत आहे.
यावेळी संत तुकडोजी महाराज विद्यालय दौंड, श्री योग विद्यालय बेटवाडी, सुभाष कूल विद्यालय काळेवाडी, मातोश्री पार्वती बाई शाळा दौंड, आलेश्वर आलेगाव, पासलकर विद्यालय नानवीज, सिद्धेश्वर विद्यालय देऊळगाव राजे, जिजामाता विद्यालय गोपाळवाडी, कै. भाऊसाहेब भागवत विद्यालय माळेवाडी, जनता माध्यमिक विद्यालय दौंड, लर्न अँड स्कूल गोपाळवाडी, आश्रम शाळा मोरे वस्ती लिंगाळी, श्रीमती वि. च. विद्यालय दौंड, जिल्हा परिषद शाळा जाधववाडी, उस्मान अली हायस्कूल भीमनगर दौंड, अगरवाल स्कूल सिद्धार्थनगर दौंड, शेजो विद्यालय दौंड, राजेश्वर विद्यालय राजेगाव, श्रीराम विद्यालय स्वामी चिंचोली, जिल्हा परिषद शाळा लोणारवाडी, स्व. लाजवंती भ. गॅरेला विद्यालय दौंड, भैरवनाथ विद्यालय दौंड, भैरवनाथ विद्यालय वायरलेस फाटा गिरिम आदी एकूण २३ शाळा-महाविद्यालयातील प्राचार्य, मुख्याध्यापक,शिक्षक उपस्थित होते.
टुकारकी करणाऱ्यांना चाप लावणार
चंद्रशेखर यादव म्हणाले की, शाळा-महाविद्यालय परिसरात ओळखी अनोळखी व्यक्तींकडून त्रास देणे, शाळेत येता जाता प्रवासात रोडरोमिंयोंकडून छेडछाड करणे, हातवारे व इशारे करून त्रास देणे, पाठलाग करणे, शाळा महाविद्यालय परिसरात थांबून टूकारकी करणे असे प्रकार आढळून आल्यास तात्काळ दौंड पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. अशा अडचणीच्या काळात गुन्हेगारांवर आळा बसवण्यासाठी टुकारकी करून त्रास देणाऱ्यांचे फोटो व्हिडीओ काढून तात्काळ पोलिसांना पाठवावेत. गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांपासून सावध राहावे, आदी सूचनाही केल्या.