सातारा – पायाभूत सुविधा, रोजगार व तंत्रशिक्षणाच्या सोयींनी समृद्ध सातारा घडवायचा असेल, तर सर्व सातारकरांनी मरगळ झटकून कामाला लागायला हवे. पायाभूत विकासाचे प्रस्ताव द्या. निधी उपलब्ध करायची जबाबदारी माझी आहे. भविष्यात सातारा जिल्हा विकासाचा ब्रॅंड बनवायचा आहे. सर्वांनी आपापली जबाबदारी समजून घेऊन पुढे यावे, असे आवाहन खा. उदयनराजे भोसले यांनी केले.
साताऱ्याच्या विकासाच्या कळीच्या मुद्द्यावर येथील जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात उदयनराजेंनी थेट तरुणाईशी संवाद साधला. व्यापार, शिक्षण, माहिती तंत्रज्ञान, हॉटेल, चित्रपट, आरोग्य, उद्योग आदी क्षेत्रातील नामवंत मंडळी उपस्थित होती. रंगकर्मी राजीव मुळ्ये व तनया भुर्के यांनी उदयनराजेंना बोलते केले. उदयनराजे म्हणाले, पूर्वीच्या काळी सुविधांच्या अभावामुळे सातारकरांना पोटापाण्यासाठी पुणे, मुंबईत स्थलांतरित व्हावे लागले. सृजनात्मक विचार आणि कृतीतून छत्रपती शिवरायांनी स्वराज्य उभे केले. तोच विचार साताऱ्याच्या पुढील वाटचालीसाठी करायचा आहे.
माहिती तंत्रज्ञान, तंत्रशिक्षण, रोजगार, पायाभूत सुविधांच्या विस्तारासाठी “संवादसेतू’ निर्माण व्हायला हवा. सातारा एमआयडीसीत रोजगार यायला हवा. येथे 47 एकरावर वसलेली महाराष्ट्र स्कूटर कंपनी पुन्हा सुरू होण्यासाठी पाठपुरावा करू. उद्योजकांना स्वस्त वीज मिळण्यासाठी माझा पाठपुरावा सुरू आहे. तुम्ही प्रस्ताव द्या, ऊर्जा मंत्र्यांसोबत बैठक घेऊ. सातारा शहराच्या पर्यटनवृद्धीसाठी एमटीडीसीचे अनेक प्रस्ताव आहेत. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या माध्यमातून या प्रस्तावांचा पाठपुरावा करू.
जिल्ह्यात चित्रपट रोजगार, देगाव व निगडी येथील प्रस्तावित औद्योगिक क्षेत्रांचे रखडलेले प्रस्ताव, मूळ सातारा शहर व हद्दवाढीतील नव्या भागांचा नियोजित विकास, पायाभूत सुविधांचा विस्तार याकरिता प्रस्ताव तयार करण्यात आले आहे. सातारा शहर झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी पंतप्रधान आवास योजनेच्या कामांना सुरुवात झाली आहे.
हद्दवाढीतील नव्या भागात सर्व खेळांचा समावेश असलेले सिंथेटिक ट्रॅकचे नवे स्टेडियम उभारण्यासाठी प्रयत्नशील आहे. यात लोकसहभाग आवश्यक आहे. भविष्यात सातारच्या विकासासाठी आपल्यात स्पर्धा व्हायला हवी. त्यासाठी लोकांचा रेटा हवा. मी एकटा काही करू शकणार नाही. सातारा घडवायचाय, तर प्रत्येकाने हिरीरीने पुढे यावे.
मासचे अध्यक्ष नाना देशमुख, आयटी व्यावसायिक पवनजीत माने, पर्यटन तज्ज्ञ अमित कदम, अभिजीत माने, शैलेंद्र करंदीकर, हॉटेल व्यावसायिक राजू भोसले, कापड व्यावसायिक सुदीप भट्टड, मल्लखांब प्रशिक्षक सुजीत शेडगे, वास्तुविशारद नेहा शेडगे, क्रेडाईचे सरचिटणीस ऍड. माजिद कच्छी, चित्रपट, मालिका निर्माते तेजपाल वाघ, ढाणे इंजिनियरिंग क्लासेसचे विशाल ढाणे, सौरभ भोसले, लोकेश उतेकर यांनी त्यांच्या क्षेत्रातील समस्या आणि साताऱ्याच्या विकासापुढील आव्हानांची मांडणी केली. उद्योजक संग्राम बर्गे व उदयनराजे मित्र परिवाराच्यावतीने या बिगरराजकीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. उदयनराजेंनी साधलेला थेट उपस्थितांना भावला. जिल्हा बॅंकेचे सभागृह गर्दीने फुलून गेले होते.
उदयनराजेंची पुन्हा “सिग्नेचर पोझ’
या कार्यक्रमात उदयनराजेंची नेहमीची शैली दिसली. त्यांनी कॉलर उडवत, “एक बार मैने जो कमिटमेंट कर दी तो’ हा डायलॉग मारलाच. त्याला तरुणाईकडून दाद मिळाली. जे काहीच करत नाहीत, तेच साताऱ्यात काहीच घडत नसल्याची टीका नेहमी करतात, असा टोमणा त्यांनी आ. शिवेंद्रसिंहराजेंना पुन्हा मारला. शाहू स्टेडियमचे काम चुकीचे झाल्याने शहरातील मोक्याची जागा गेली.
तत्कालीन विकासक व तत्कालीन पालकमंत्री कोण, हे मी सांगायला नको, अशी टिप्पणी उदयनराजेंनी उपमुख्यमंत्री अजित पवारांचे नाव न घेता केली. सातारा शहराच्या विकासासाठी उदयनराजेभोसले डॉट कॉम या संकेतस्थळाचे अनावरण हस्ते करण्यात आले. अनिमेष कुलकर्णी व अजय म्हैसेकर यांच्या औषध उत्पादक कंपनीचे लॉंचिंग झाल्याची घोषणा उदयनराजेंनी केली.