जुन्नर -जुन्नर तालुक्यात बुधवारी (दि. 8) करोनाबाधितांची संख्या 17ने वाढल्यामुळे खळबळ उडाली आहे. बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेले धनगरवाडी, धालेवाडी, वारूळवाडी व नारायणगाव येथील एकूण 17 जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे नागरिकांची चिंता वाढली आहे.
त्यामुळे तालुक्यातील ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 46 झाली असून करोनावर 56 जणांनी यशस्वीरीत्या मात केली आहे. तर औरंगपूर, मोकसबाग व पिंपळगाव तर्फे नारायणगाव (वाणीमळा) येथील प्रत्येकी एक रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
लेण्याद्री येथील कोविड केअर सेंटरमध्ये (दि. 7) 36 संशयित रुग्णांचे नमुने घेतले असून आजअखेर 982 संशयितांचे स्वॅब येथे घेतल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. सध्या तालुक्यात 3854 व्यक्ती क्वारंटाइन असून तब्बल 356 टीम सर्व्हेक्षणाचे काम करीत आहेत.