जम्मू काश्‍मीरमध्ये दहशतवाद्यांकडून जवानाची हत्या

श्रीनगर – उत्तर काश्‍मीरमधील बारामुला जिल्ह्यातील वारपोरा सोपोर परिसरात दहशतवाद्यांनी भारतीय जवानाची गोळी घालून हत्या केली आहे. मोहम्मद रफिक याटू असे या जवानाचे नाव आहे. दहशतवाद्यांनी घरात घुसून सुट्टीवर आलेल्या रफिक यांची हत्या केली आहे.

जम्मू आणि काश्‍मीर लाइट इन्फन्ट्रीमध्ये (जेएकेएलआय) मोहम्मद रफिक हे कार्यरत होते. सुट्टीनिमित्त ते आपल्या घरी परतले होते. दहशतवाद्यांनी त्यांना खुप जवळून गोळी घातल्याने ते या हल्ल्यात गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या हत्येमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मद रफिक यांना गोळीबारानंतर उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. सुरक्षा यंत्रणांनी या दहशतवाद्यांना पकडण्यासाठी परिसरात नाकाबंदी करत शोधमोहित सुरु केली आहे.

दरम्यान, सुट्टीनिमित्त घरी आलेल्या जवानांची दहशतवाद्यांकडून हत्या करण्याची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वीही सुट्टीवर आलेले जवान औरंगजेब आणि लेफ्टनंट उमर फैय्याज यांची दहशतवाद्यांनी हत्या केली होती.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.