देशाच्या प्रगतीला “स्पीड ब्रेकर दीदी’कडून अडथळा- पंतप्रधान नरेंद्र मोदी

पश्‍चिम बंगालमधील सभेत मोदींकडून ममता बॅनर्जींवर टीकास्त्र

कूच बेहार, (पश्‍चिम बंगाल) – “स्पीड ब्रेकर दीदी’नी केंद्र सरकारच्या विविध योजनांना ब्रेक लावला आहे. त्यामुळे देशातील अन्य भागातील मिळणारे लाभ पश्‍चिम बंगालमधील जनतेला मिळू शकलेले नाहीत, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. जे देशाला खंडीत करू पहात आहेत आणि दोन पंतप्रधानांच्या सिद्धांताला पाठिंबा दिला जातो, त्यांच्याबरोबर ममता बॅनर्जी यांनी संगनमत केल्याचा आरोपही पंतप्रधानांनी केला. गेल्या आठवड्यात नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी जम्मू काश्‍मीरसाठी स्वतंत्र पंतप्रधानांची मागणी केली होती. त्यावर भाजपच्या नेत्यांकडून संतप्त प्रतिक्रिया दिली गेली होती.

दीदींचे बालिश कृत्य विजयासाठी अपुरे…
आपल्या सभेसाठी छोटे मैदान उपलब्ध करून दीदीनी आपल्या सभेला मोठी गर्दी होऊ देणे टाळले आहे. ममता बॅनर्जी मतपेढी जपण्यासाठी बेकायदेशीर घुसखोरांना संरक्षण देत आहेत. या घुसखोरांना बाहेर काढण्यासाठीच “नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीझन्स’ आणि “सिटीझन्स’ दुरुस्ती विधेयक केंद्र सरकारने आणले. मात्र दीदी आणि त्यांचे “महामिलावट’ आघाडीतील घटक आपल्याला तसे करण्यापासून रोखत आहेत. अशा बालिश कृत्यामुळे त्या निवडणूक कशी जिंकू शकतील, असा प्रश्‍न पंतप्रधानांनी विचारला.

मतपेढीच्या राजकारणासठी दीदी देश खंडीत करणाऱ्यांना सहकार्य करत आहेत. दोन पंतप्रधानांच्या सिद्धांताला पाठिंबा देत आहेत. एक पंतप्रधान भारताला आणि एक काश्‍मीरला असे दोन पंतप्रधान चालतील का, असा प्रश्‍नही त्यांनी विचारला. अखंद भारत आणि काश्‍मीरसाठी जनसंघाचे संस्थापक शामाप्रसाद मुखर्जी यांच्या योगदानाचे पंतप्रधानांनी यावेळी स्मरण केले. या योगदानाचा ममता बॅनर्जी अवमान करत आहेत. बॅनर्जी यांनी पश्‍चिम बंगालमध्ये गुंडांना मोकळे सोडले आहे. त्यामुळे जनतेच्या आशा आकांक्षा धुळीस मिळाल्या आहेत.

शारदा, रोज व्हॅली आणि नारदा घोटाळ्यांमुळे दीदींनी पश्‍चिम बंगालची प्रतिमा मलिन केली आहे. लुटल्या गेलेल्या प्रत्येक पैशाचे उत्तर चौकीदार मागणार आहे. जनतेचे निखळ प्रेम आणि पाठिंबा आपल्याला मिळत आहे. याचच “स्पीड ब्रेकर दीदीं’ना त्रास होतो आहे. निवडणूक आयोगावरील त्यांच्या रागातूनच त्यांचे नैराश्‍य दिसते आहे, असे पंतप्रधान म्हणाले. पश्‍चिम बंगालमध्ये 7 टप्प्यात मतदान घेण्यावर ममता बॅनर्जी यांनी नाराजी व्यक्‍त केली होती.

ममता बॅनर्जी यांचे तृणमूल कॉंग्रेसचे सरकार पूर्वीच्या डाव्या आघाडीच्या सरकारचीच प्रतिकृती आहे. “बुवा भतिजा’च्या शासनाने पश्‍चिम बंगालला घुसखोरांसाठी सुरक्षित आश्रय बनवला आहे, अशी टीका पंतप्रधानांनी केली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.