पुणे – सीओईपी मैदानावरील जम्बो कोविड रुग्णालयात रुग्ण दाखल करून घेणे तूर्तास बंद करण्यात आले असून डॉक्टर आणि नर्सच्या उपलब्धतेच्या प्रमाणात रुग्ण दाखल करून घेण्यात येतील, अशी माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली.
महापालिका, पीएमआरडीए, राज्य सरकार यांच्या माध्यमातून शहरात जम्बो कोविड रुग्णालय उभारण्यात आले आहे. “लाइफलाइन’ या संस्थेकडून ते चालविण्यात येत असून, मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची जबाबदारी या संस्थेची आहे. त्यामुळे सध्या याठिकाणी उपलब्ध असलेल्या मनुष्यबळाच्या अनुषंगाने रुग्ण भरती करण्यात येत आहे. शहरात बाहेर गावावरुन येणाऱ्या रुग्णांची संख्या देखील मोठी आहे. त्यांनाही शहरात उपचार देण्यात येत आहेत.
“लाइफलाइन’ या संस्थेमार्फत जम्बो रुग्णालयात सध्या 360 ते 400 रुग्णांवर उपचार होऊ शकतात. प्रशासनाकडून अन्य संस्थांकडून डॉक्टर आणि कर्मचारीवर्ग मागवण्यात येत आहेत. त्याचबरोबर जम्बो कोविड सेंटरच्या निविदेमध्ये ज्या कंपन्या 2 आणि 3 क्रमांकावर होत्या त्यांच्याकडूनही कर्मचारी घेण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, असे विक्रम कुमार यांनी सांगितले.
याठिकाणी लवकरच काही डॉक्टर आणि कर्मचारी येण्याची शक्यता आहे. यानंतर रुग्णांना प्रवेश देण्यात येणार असल्याचे कुमार यांनी स्पष्ट केले आहे. मुंबईमधील चार जम्बो कोविड सेंटरची जबाबदारी याच संस्थेकडे आहे.
जम्बो कोविड सेंटरची निविदा पीएमआरडीएने काढली आहे. त्यामुळे यामधील अटी आणि शर्यतीमध्ये कोणते मुद्दे आहेत. याचा विचार करुन पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे कुमार यांनी सांगितले.