कर्जत (विजय डेरवणकर) – सर्वांनाच प्रतीक्षा असलेली माथेरान राणी शनिवार पासून रुळावर आल्याने स्थानिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. हारतुरे परिधान करून राणीचे आगमन माथेरान स्थानकात झाले यावेळी तिच्या स्वागतासाठी असंख्य नागरिक यावेळी उपस्थित होते.
नेरळ स्टेशनवरून माथेरानला वाहनाने जाता येते. मात्र येथील डोंगर-दऱ्याचा आनंद घ्यायचा असेल तर माथेरानच्या राणीने प्रवास करायला हवा. बच्चे कंपनीची ही आवडती ट्रेन असली तरी त्यामधील सोयी सुविधांमुळे प्रौढांचीही ही आवडती ट्रेन झाली आहे. तर काही हौसी प्रवासी अगदी पायी डोंगर चढून माथेरानला जातात.
सकाळी 9 वाजता नेरळ स्थानकातून ही मिनिट्रेन निघाली होती. ती माथेरान स्थानकात एक वाजता पोहोचली. यातून 96 प्रौढांनी तर पाच लहान मुले असे एकूण 101 प्रवाशांनी पहिल्याच दिवशी निसर्गरम्य वातावरणात प्रवासाचा लाभ घेतला आहे. या गाडीचे अद्यापही आरक्षण होत नसल्याने गाडी सुटण्यापूर्वी पाऊण तास अगोदरच प्रत्येक प्रवाशांना केवळ चार तिकीटे उपलब्ध होऊ शकतात असे रेल्वेच्या कार्यालयातून सांगण्यात आले आहे.
असा आहे तिकीट दर
नेरळ-माथेरान-नेरळ या ट्रेनमध्ये विस्ताडोम बोगीसाठी प्रति प्रवासी 750 रुपये, प्रथम श्रेणीसाठी 340 रुपये तर द्वितीय श्रेणी करिता 95 रुपये इतका तिकीट दर आहे. विस्ताडोम आणि प्रथम श्रेणी करिता तिकिटासाठी स्वतंत्र रांग असणार आहे.
बच्चे कंपनीच नव्हे तर सर्वांच्याच आवडीची मिनिट्रेन सुरू झाल्यामुळे इथल्या पर्यटनात वाढ होणार आहे. सध्या दोन गाडया सुरू केल्या आहेत. त्या पर्यटकांच्या दृष्टीने अपुऱ्या असून सर्व पर्यटकांना याचा लाभ घेता येऊ शकत नाही. त्यासाठी रेल्वे प्रशासनाने या फेऱ्यात वाढ करणे गरजेचे आहे.
जनार्दन पार्टे, सामाजिक कार्यकर्ते, माथेरान
आजच्या पहिल्याच दिवशी आम्ही या ट्रेनची सफर आमच्या कुटुंबासोबत आनंदाने केली. डोंगर दर्यातील निसर्गसौंदर्य न्याहाळत असताना खूपच मस्त अनुभव आला आहे. खूप हळूहळू गाडी चालत असते त्यामुळेच या मार्गावर तीन तासाहून अधिक वेळ लागतो. त्यासाठी थोडा आणखीन वेग वाढविल्यास माथेरानला लवकर जाता येऊ शकते आणि हॉटेलमध्ये विश्रांती घेता येईल.
– नित्यनाथ कासारे, पर्यटक, मुंबई