पुणे – जेजुरी येथील मार्तंड देवस्थानच्या विश्वस्तपदी कोणाकोणाची नेमणूक होणार ही उत्सुकता आता संपली असून, शुक्रवारी धर्मादाय कार्यालयाकडून सात विश्वस्तपदांचे नावे जाहीर करण्यात आली आहे.
त्यामध्ये जेजुरी येथील मार्तंड देवस्थानच्या विश्वस्तपदी अभिजित अरविंद देवकाते (रा. बारामती), डॉ. राजेंद्र बबन खेडेकर (रा. कोथरूड), मंगेश अशोक घोणे (रा. जेजुरी), विश्वास गोविंद पानसे (रा. बारामती), अनिल रावसाहेब सौंदाडे, पुणे बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ऍड. पांडुरंग ज्योतिबा थोरवे (रा. बालेवाडी) आणि पोपट सदाशिव खोमणे (रा. जेजुरी) अशी नवनियुक्त विश्वस्तांची नावे आहेत.
ही नेमणूक पाच वर्षांसाठी असणार आहे. याआधी जेजुरी देवस्थान विश्वस्तांच्या नेमणुका 2017 ला झाल्या होत्या. त्यांची मुदत डिसेंबर-2022 मध्ये संपली होती. यानंतर नवीन विश्वस्तांच्या पदासाठी अनेकांनी अर्ज दाखल केले होते. त्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या.
त्यापैकी या सात जणांची नेमणूक पुणे सहधर्मादाय कार्यालयाचे सहआयुक्त सुधीरकुमार बुक्के यांनी केल्या आहेत. या विश्वस्तांमधून प्रमुख विश्वस्तांची निवड बैठक घेऊन विश्वस्तच करणार आहेत. एका प्रमुख विश्वस्तांचा कालावधी हा नऊ महिन्यांचा असून प्रत्येक विश्वस्तांना पाच वर्षांत नऊ- नऊ महिन्यांच्या अंतराने प्रमुख विश्वस्तपद मिळणार आहे.