पाटणा: संयुक्त जनता दलाला बिहार खेरीज आता अरूणाचलातील प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता मिळाली आहे. अरूणाचल प्रदेशात नुकत्याच झालेल्या विधानसभाच्या निवडणुकांमध्ये या पक्षाला 60 पैकी 7 जागा मिळाल्या आहेत. या राज्यात भारतीय जनता पक्षाला 41 जागा मिळाल्या आहेत त्यानंतर सर्वाधिक जागा मिळणवणारा हा दुसरा पक्ष ठरला आहे. या पक्षाला अरूणाचल प्रदेशात प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता देण्यात येत असल्याची घोषणा आज निवडणूक आयोगाने केली.
बाण हे निवडणूक चिन्ह या पक्षाला आता अरूणाचल प्रदेशातहीं अधिकृतपणे वापरता येणार आहे. जेडीयु पक्षाचे सरचिटणीस के सी त्यागी यांनी या निर्णयाचे स्वागत करताना म्हटले आहे की आम्हाला त्या विधानसभेत प्रमुख विरोधी पक्ष म्हणून मान्यता मिळाली असली तरी आम्ही सत्तारूढ भारतीय जनता पक्षालाच पुर्ण सहकार्य करणार आहोत. आमची तेथील भूमिका सत्ताधारी पक्षाचा मित्र पक्ष अशीच असेल असेही त्यागी यांनी सांगितले.