इस्लामाबाद: पाकिस्तानातील उत्तर वजिरीस्तान प्रांतात रस्त्याच्या कडेला पेरून ठेवण्यात आलेल्या बॉंम्बचा स्फोट होऊन झालेल्या घटनेत लष्कराचे तीन अधिकारी आणि एक जवान असे एकूण चार जण ठार झाले आहेत. त्या प्रांतातील खारकामर जिल्ह्यात हा प्रकार घडला. लष्करी वाहने उडवण्यासाठीच हा आयईडी स्वरूपाचा बॉंम्ब तेथे दहशतवाद्यांनी पेरून ठेवला होता.
या स्फोटात अन्य चार जवान जखमी झाले आहेत. लष्कराच्या माहिती विभागानेच ही माहिती दिली आहे. या हत्या प्रकरणाची अद्याप कोणत्याही गनिमी संघटनेने जबाबदारी स्वीकारलेली नाही. महिनाभराच्या अवधीत त्या भागात लष्करावर झालेल्या हल्ल्यात आत्तापर्यंत एकूण दहा लष्करी लोक ठार झाले आहेत. तर 35 हून अधिक जवान आणि अधिकारी जखमी झाले आहेत.