मुंबई – जगमोहन दालमिया ज्या पद्धतीने भारतीय क्रिकेटकडे पैशांचा ओघ येण्यासाठी अनेक कल्पना राबवायचे त्याच धर्तीवर बीसीसीआयचे सध्याचे सचिव जय शहा देखील आपल्या योजना यशस्वी करत आहेत. आयसीसीच्या बैठकीत बीसीसीआयचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहिलेल्या शहा यांच्या कल्पना ऐकल्यानंतर आयसीसीच्या सदस्यांनीही शहा यांच्या दृष्टिकोनाचे कौतुक केले असून येत्या काळात त्यावर विचार केला जाण्याचेही संकेत दिले आहेत.
करोनाचा फटका क्रिकेटसह जगभरातील क्रीडा संघटनांना बसला आहे. आयसीसीनेही सर्व स्पर्धा अनिश्चित काळासाठी रद्द केल्या आहेत. मात्र, येत्या काळात सामन्यांचे तसेच मालिकांचे नियोजन करण्यासाठी बैठक आयोजित केली गेली होती. त्यात शहा यांनी आपल्या कल्पना मांडल्या.
त्याला आयसीसीच्या सर्व सदस्यांनी उपस्थिती राखली होती. त्यात शहा यांनी पुढील दीड वर्षांमध्ये विविध स्पर्धा कशा पद्धतीने घेता येतील तसेच 2023 पर्यंत सर्व देशांचे क्रिकेट सामन्यांचे वेळापत्रक कसे तयार करता येईल, याबाबतही शहा यांनी आपले मत मांडले व त्याला अनेक देशांच्या प्रतिनिधिंनी समर्थनही दिले. एकूणच दालमिया ज्या पद्धतीने जागतिक क्रिकेटला आपल्या कल्पना शक्तीचा दाखला देत होते आज तीच भूमिका शहा वठवत आहेत.
करोनामुळे नुकसान झालेल्या अनेक देशांच्या क्रिकेट मंडळांना बीसीसीआय सर्व सहकार्य करेल, असा विश्वास अन्य सदस्यांना देण्यात शहा यशस्वी झाले हेच या बैठकीचे सर्वात मोठे यश ठरले. आता येत्या काळात करोनाचा नायनाट झाला की भारतीय संघ विविध देशांशी मालिका खेळेल व या मंडळांना नुकसानीतून बाहेर काढण्यासाठी विविध मालिका आयोजित करेल, असे संकेतही शहा यांनी बैठकीत दिले.