“जायका’ प्रकल्प तातडीने सुरू करा : जावडेकर 

असा असेल प्रकल्प…

या प्रकल्पांतर्गत, अकरा नवे सांडपाणी प्रक्रिया केंद्र बांधले जाणार असून, त्याच्याशी 113.6 किलोमीटर्सच्या सांडपाणी पाइपलाइन्स टाकल्या जाणार आहेत. या पाइपलाइन्समधून सध्या असलेल्या चार पंपिंग स्टेशन्समधले सांडपाणी, प्रक्रिया केंद्रांमध्ये आणले जाईल. यामुळे, पुण्यातल्या सांडपाणी प्रक्रिया केंद्रांची क्षमता 477 एमएलडीवरून
873 एमएलडीपर्यंत वाढणार आहे. ही क्षमता 2027 पर्यंत सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी सक्षम असेल.

पुणे – मुळा-मुठा नदी संवर्धन प्रकल्पाच्या (जायका) दिरंगाईवरून महापालिका प्रशासनाची रविवारी चांगलीच झाडाझडती घेतली. या प्रकल्पाचे काम जुलैच्या पहिल्या आठवड्यात सुरू करून टप्प्याटप्प्याने निविदा प्रक्रिया राबवित हे काम तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना प्रशासनास दिल्याची माहिती सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी दिली. तसेच या योजनेचा आढावा स्वत: जावडेकर प्रत्येक दोन ते महिन्यांनी घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

केंद्र शासनाच्या माध्यमातून जपानमधील “जायका’ कंपनीच्या माध्यमातून महापालिका सुमारे 951 कोटी रुपयांचा नदीसुधार प्रकल्प राबवित आहे. केंद्राने तीन वर्षांपूर्वी या प्रकल्पास मान्यता दिलेली असली, तरी अद्याप या योजनेचे काम सुरू झालेले नाही. त्यामुळे पुणे दौऱ्यावर आलेल्या जावडेकर यांनी या योजनेचा आढावा घेतला. त्यात निविदा प्रक्रियेची माहिती, सल्लागार कंपनीची माहिती, केंद्राकडून मिळालेले अनुदान, पालिकेकडून या प्रकल्पाअंतर्गत आतापर्यंत केलेल्या खर्चाची माहिती त्यांनी घेतली.

त्यानंतर या कामाबाबत होत असलेल्या दिरंगाई याबाबत नाराजी व्यक्त केली. हा प्रकल्प म्हणजे केंद्रशासनाने दिलेली भेट असून या योजनेचा सर्व खर्च केंद्रशासन करणार आहे. अशा स्थिती महापालिका अथवा राज्य शासनाला काहीही कमी पडणार नसताना दिरंगाई योग्य नसल्याचे सांगत त्यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच महापालिकेकडून एकाच वेळी काम सुरू न करता टप्प्याटप्प्यात काम सुरू करण्यासाठी जुलैच्या पहिल्या आठवड्यात काम सुरू करावे तसेच उर्वरित पॅकेजचे काम ऑगस्टपासून सुरू करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या. यावेळी खासदार गिरीश बापट, महापौर मुक्‍ता टिळक, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, स्थायी समिती अध्यक्ष सुनील कांबळे यांच्यासह आयुक्‍त सौरभ राव, जायका प्रकल्पाचे अधिकारी उपस्थित होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.