जुन्नर – मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे मराठा नेते मनोज जरांगे पाटील उद्या (दि. २०) किल्ले शिवनेरीवर नतमस्तक होण्यासाठी शिवजन्मभूमीत येणार आहेत. तालुक्यात त्यांच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू असून ठिकठिकाणी स्वागत फलक, कमानी उभारण्याचे काम सुरू आहे.
गुरूवारी (दि. १९) रात्री ते जुन्नर येथे मुक्कामी असून शुक्रवारी सकाळी सात वाजता शिवनेरी किल्ल्यावर नतमस्तक होणार आहेत. तसेच येथील शिवाई देवीचे दर्शन घेतल्यावर किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी असलेल्या महाराजांच्या स्मारकाजवळ त्यांचा जाहीर सन्मान होणार आहे.
त्यानंतर ते राजगुरुनगर येथील सभेसाठी रवाना होणार आहेत. त्यांच्या या भेटीप्रसंगी नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने विविध ठिकाणी चहावाटप तसेच अन्नदानाचे स्टॉल्स उभारले आहेत. सकल मराठा समाज शिवजन्मभूमी तसेच जेसीबी संघटना, वाद्यवृंद संघटना आदींनी या दौऱ्यासाठी विशेष परिश्रम घेतले आहेत.