टोकियो – जपानची अवकाश संशोधन संस्था “जाक्सा’च्या कॅप्स्यूलमधून अवकाशातील लघुग्रहाचे नमुने पृथ्वीवर पाठवले गेले. ही कॅप्स्यूल ऑस्ट्रेलियाच्या दक्षिण भागातील निर्जन ठिकाणी सुखरूप पृथ्वीवर उतरली. त्यानंतर तिचा शोध घेऊन लघुग्रहाचे मौल्यवान नमुने शोधून काढण्यासाठी “जॅक्सा’चे हेलिकॉप्टर आणि शोधपथ्क या भागामध्ये पोहोचले होते.
ही कॅप्स्यूल शोधून काढून त्यातील नमुने ताब्यात घेण्यात आले आहेत. हे नमुने आता संशोधकांच्या स्वाधीन केले जाणार असून त्याच्या आधारे जीवसृष्टीच्या संदर्भातील मौल्यवान माहिती मिळण्याची शक्यता आहे, असे जपानच्या अंतराळ संशोधन संस्थेने म्हटले आहे.
“हयाबुसा 2′ ने शनिवारी लहान कॅप्सूल यशस्वीरित्या सोडला लघुग्रहाचे नमुन्यांसह पृथ्वीकडे पाठविले, असे जपान एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सीने म्हटले होते. ही कॅप्स्यूल पृथ्वीपासून 120 किलोमीटर उंचीवर असताना पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करताच ही कॅप्स्यूल पेटली होती. मात्र तिच्या गुणधर्मानुसार ती नष्ट झाली नाही आणि नमुने सुरक्षित राहिले.
पेटलेली कॅप्स्यूल एखाद्या उल्केप्रमाणे अवकाशात स्पष्ट दिसू शकत होती. अवकाशातून 10 किलोमीटर अंतर शिल्लक राहिल्यावर कॅप्स्यूलचे पॅरेशूट उघडले गेले आणि ती अलगत पृथ्वीवर उतरली. त्यानंतर कॅप्स्यूलमधील सिग्नलही दिले जाऊ लागले होते. त्याच्या आधारे कॅप्स्यूलचा ठावठिकाणा शोधला जाऊ शकला.
कॅप्सूल परत आल्यानंतर सुमारे दोन तासांनंतर “जॅक्सा’च्या हेलिकॉप्टर शोध पथकाला नियोजित लॅंडिंग क्षेत्रात कॅप्सूल सापडला, असे “जॅक्सा’ने सांगितले. ही कॅप्स्यूल पृथ्वीवर पोहोचल्यानंतर चार तासांनी कॅप्स्यूल ताब्यात घेण्यात आली. त्यानंतर “जॅक्सा’ने एक ट्विट करून नमुने ताब्यात घेतले गेले असून कॅप्स्यूल पृथ्वीवर पोहोचवण्याचे मिशन पूर्ण झाले असल्याचे ट्विट केले आहे.
ही कॅप्सूल “हयाबुसा 2′ पासून वेगळी झाल्यानंतर पृथ्वीपासून तब्बल 220,000 किलोमीटर अंतरावरुन खाली आली. इतक्या उंचीवरून येणाऱ्या कॅप्स्यूलला नियंत्रित करणे ही खूप अवघड बाब होती. ऑस्ट्रेलियाच्या अंतराळ प्रयोगशाळेत प्राथमिक सुरक्षा तपासणी करून पुढच्या आठवड्याच्या सुरुवातीला कॅप्सूल जपानला परत आणण्याची आशा असल्याचे “जॅक्सा’च्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
लघुग्रहाचे नमुने परत आणण्याची तयारी करण्यासाठी “जॅक्सा’चे डझनभर कर्मचारी ऑस्ट्रेलियाच्या दक्षिणेक्डील वूमेरा या गावाजवळ कार्यरत होते. त्यांनी सिग्नल मिळविण्यासाठी ऑस्ट्रेलियन एअर फोर्स टेस्ट फील्डमध्ये अनेक ठिकाणी सॅटेलाइट डिशेस बसवल्या होत्या. त्या सर्व तंत्रज्ञांना आता समाधान वाटत असल्याचे “जॅक्सा’ने म्हटले आहे.
या नमुन्यांमधून सौर ग्रहमंडळाच्या उत्पत्तीबाबत मोलाची माहिती मिळण्याची शक्यता आहे. तसेच पृथ्वीबाबतही संशोधनासाठी त्या नमुन्यांचा उपयोग होण्याची शक्यता आहे. सर्व नियोजित संशोधन करण्यासाठी 0.1 ग्रॅम धूळ पुरेशी असेल, असे मिशन मॅनेजर योशिकावा म्हणाले.
ही कॅप्स्यूल पृथ्वीवर पाठवणारे “हायाबुसा 2′ हे अंतराळ स्थानक 2014 पासून सक्रिय आहे.
आता हे अवकाश स्थानक 1998केवाय26 नावाच्या लघुग्रहाच्या दिशेने सरकत आहे. त्यासाठी या यानाला 10 वर्षे लागतील. आतापर्यंत त्याचे उद्दिष्ट पूर्णपणे यशस्वी झाले आहे. रियगु या लघुग्रहावरील अत्यंत खडकाळ पृष्ठभाग असूनही “हायाबुसा 2’ने त्यांला दोनदा स्पर्श केला. जून 2018 मध्ये तेथे पोहोचल्यानंतर रियगुजवळ जवळपास 1 वर्षात डेटा आणि नमुने यशस्वीरित्या गोळा केले.