मुंबई – सातत्याने वादाच्या केंद्रस्थानी येत असलेल्या सैफ अली खानने त्याच्या आगामी “आदिपुरुष’ या चित्रपटामधील आपल्या भूमिकेबाबत वाद ओढवून घेताना दिसत आहे. या चित्रपटातील रावण या च्यक्तिरेखेविषयी सैफने अनावश्यकरित्या, अभ्यास नसतानाअ वादग्रस्त विधाने करत हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप त्याच्या वर करण्यात येत आहे.
“आदिपुरुष’या चित्रपटात लंकेशची व्यक्तिरेखा वाईट नसून मनोरंजक आहे. आम्ही ती अतिशय मनोरंजक पद्धतीने सादर करणार आहोत. रावणाने केलेल्या सीता हरणालाही आम्ही न्यायसंगत दाखवणार आहोत. रावणाला आपण आजपर्यंत खलनायकाच्या भूमिकेत पाहिले. पण तो खलनायक नव्हताच. रावण हादेखील एक माणूस होता. रामासोबतचे त्याचे युद्ध ही सूडाची कहाणी असल्याचे आम्ही दाखवणार आहोत. रामाचा बंधु लक्ष्मणाने रावणाची बहिण शुर्पणखाचे नाक कापल्यामुळे हे सूडनाट्य सुरू झाले होते, असे सैफ या मुलाखतीत म्हणाला होता.
सैफच्या या वक्तव्यावर सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. “#बॉयकॉट आदिपुरूष’, “#वेकअप ओमराऊत’ असे हॅशटॅग ट्रेंड होत आहेत. अनेकांनी सैफला सिनेमातून काढून टाकण्याची मागणीही केली आहे. सैफच्या या वक्तव्याचा राम कदम यांनी तिखट शब्दांत समाचार घेतला. “आदिपुरूष या सिनेमात सैफ अली खान रावणाची भूमिका साकारतो आहे. रावणाच्या भूमिकेला हिरोसारखे निभावेन, असे तो म्हणत आहे. लक्ष्मणाने रावणाच्या बहिणेचे नाक कापले त्यामुळे रावणाने सीतामातेचे अपहरण केले, प्रभु रामचंद्रासोबत युद्ध केले, असे सैफ म्हणत आहेत. सैफ रावणाच्या दुष्कृत्याला न्याय देण्याची भाषा करत असतील त्याचे समर्थन कसे होईल? प्रभू रामचंद्रांनी धर्म स्थापित केला, आमची आस्था आणि श्रद्धा आहे. राम आणि रावणाची लढाई ही धर्म-अधर्म यांची लढाई आहे. आता ते अधर्माला योग्य ठरवत आहेत, अशा शब्दांत सैफवर टीका केली जात आहे.
निर्माता आणि दिग्दर्शकाने हिंदूंच्या आस्थांचा आदर करत सिनेमा बनवावा, असे राम कदम यांनी ओम राऊतसह सैफला बजावले आहे.