देशभरात लॉकडाऊन सुरू असल्याने चित्रपटगृहे कधी सुरू होतील हे अद्याप निश्चितपणे सांगता येऊ शकत नाही. या पार्श्वभूमीवर अनेक चित्रपट प्रदर्शित होण्याच्या प्रतीक्षेत आहे. या संकटकाळात पारंपरिक चित्रपटगृहात प्रदर्शित होण्याऐवजी जान्हवी कपूर अभिनीत “गुंजन सक्सेना : द कारगिल गर्ल’ ओटीटीच्या प्लॅटफार्मवर रिलीज करण्यात येणार आहे. याबाबत निर्माता आणि नेटफ्लिक्सने अधिकृतपणे पुष्टी दिली आहे.
तथापि, अद्याप रिलीजची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. “गुंजन सक्सेना : द कारगिल गर्ल’ हा चित्रपट भारतीय वायुसेनेच्या फायटर पायलट गुंजन सक्सेना यांच्या जीवनावर आधारित आहे. यात जान्हवीने मुख्य भूमिका साकारली आहे.
1999 च्या कारगिल युद्धात गुंजन सक्सेनाने प्रत्यक्ष रणांगणात उतरत निर्णायक भूमिका पार पाडली होती. या चित्रपटाबाबत निर्माता करण जोहर म्हणाला, “गुंजन सक्सेना’ ही अशा एका महिलेची सत्य कथा आहे, जिने आपल्या धाडसी कामगिरीने येत्या काही वर्षांत अनेकांना धैर्य व प्रेरणा दिली आहे.
आम्ही तुमच्या हृदयात आणि जगातील कोट्यवधी प्रेक्षकांना या निडर महिलेची कथा दाखविण्यासाठी उत्सुक आहे.’ शरण शर्मा दिग्दर्शित या चित्रपटात पंकज त्रिपाठी, अंगद बेदी, विनीत कुमार, मानव विज आणि आयशा रजा आदी कलाकारांची फौज आहे.