सोलापूरच्या भाजपच्या खासदारांची खासदारकी धोक्यात
जात पडताळणी कार्यालयातून तक्रारदारांच्या हातात जातीचा दाखला रद्दची प्रत
सोलापूर, (सूर्यकांत आसबे) – सोलापूरचे भाजपचे खासदार नुरंदस्वामी गुरबसय्या हिरेमठ उर्फ डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांचा बेडाजंगम जातीचा दाखला जात पडताळणी समितीने बनावट असल्याचे सांगून रद्द केला आहे. तक्रारदार प्रमोद गायकवाड यांनी माहितीची प्रत मिळाल्यावर पत्रकारांशी ही माहिती दिली.
प्रमोद गायकवाड यांनी लोकसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यावेळी त्यांनी डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या जातप्रमाणपत्रावर आक्षेप घेतला होता. परंतु निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आक्षेप फेटाळला होता.
याच दरम्यान या जात प्रमाणपत्राविरुद्ध प्रमोद गायकवाड यांच्यासह विनायक कंदकुरे आणि मिलिंद मुळे यांनी जातपडताळणी समितीकडे रितसर तक्रार दाखल केली होती. खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या बेडा जंगम जात प्रमाणपत्रवरील अंतिम सुनावणी 15 फेब्रुवारीला पूर्ण झाली होती. यावेळी अंतिम युक्तिवाद करताना खासदारांचे वकील संतोष न्हावकर यांनी दक्षता पथकाने फसली उताऱ्याबाबत दिलेल्या अहवालावर म्हणणे दाखल केले होते.
या सुनावणीत खासदारांच्या वकिलांमार्फत सादर करण्यात आलेले 12 अर्ज दक्षता समितीने फेटाळून लावले होते. तर तक्रारदारांनी सादर केलेला साक्षीदार पडताळणीचा अर्जही समितीने फेटाळला होता. महास्वामींच्या सख्या भावाचा मुलगा जंगम इतर मागासवर समूहातील आणि महास्वामी बेडा जंगम अनुसूचित जाती समूहातील आरक्षणाचे लाभ घेत असल्याचे दिसून आल्याचे पत्रात म्हंटले आहे.
त्यामुळे खासदार महास्वामींचे बेडा जंगम (अनुसूचित जाती) या जातीचे जात प्रमाणपत्र व बेडा जंगम या जातीचा दावा हा मुळात खरा व सत्य नसल्याची बाब पडताळणीसमोर उघड झाली. महास्वामी यांनी मौजे तलमोड येथील तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संगनमत करून बनावट नोंदी तयार करून त्या मूळ अभिलेखामध्ये समाविष्ट करून ते खरे असल्याचे दर्शवून बनावट पुरावे तयार करून जातीच्या दाव्याच्यासमएर्थनार्थ सादर केलेली आहे. ही अतिशय गंभीर बाब असून शासकीय मूळ अभिलेखांमध्ये संगनमत हेराफेरी करून बनावट नोंदी तयार केल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे खासदार महास्वामी यांच्या जातीदाव्याच्या समर्थनार्थ ग्राह्य ठरत नसल्याचा शेरा मारत जातपडताळणी समितीने महास्वामींचा दावा अमान्य केला आहे.
जात पडताळणी समितीने सोमवारी अंतिम निकाल देत महास्वामींच्या बनावट दाखल्याचा पर्दाफाश केला. यानंतर खासदारांसह इतरांविरोधात जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडे फिर्याद दाखल करण्याचे निर्देश पडताळणी समितीने अक्कलकोट तहसीलदारांना दिले आहेत.
दरम्यान जात पडताळणी समितीने सांगूनही महास्वामींच्या या मुळ कागदपत्रबाबत तक्रारदाराने आक्षेप घेतला होता. ती कागदपत्रे सादर करण्यात आली नाहीत. त्यामुळे महास्वामींची खासदारकी धोक्यात आली आहे. जर जात दाखला खोटा ठरला असेल तर स्वामींची निवडणूक रद्द होणार काय? त्याला यातून स्थगिती मिळणार का? किंवा पोटनिवडणूक लागणार का? वगैरे चर्चा सध्या सोलापूरच्या राजकारणात रंगल्या आहेत.
जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी लोकसभा निवडणूकीत भाजपकडून निवडणूक लढवून कॉंग्रेसचे माजी केंद्रीय गृहमंत्री व कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर या दोघांचाही पराभव केला होता. खासदार महास्वामीजीं बेडा जंगम जातीचा दाखला बनावट ठरल्याचे उघड झाल्यानंतर भारतीय जनता पार्टीत एकच खळबळ माजली आहे.