माधव विद्वांस
जागतिक क्रिकेट विक्रमवीर सर डोनाल्ड जॉर्ज ब्रॅडमन यांचा आज स्मृतिदिन. त्यांचा जन्म 27 ऑगस्ट 1908 रोजी ऑस्ट्रेलियातील न्यू साउथ वेल्समधील कुटामुंद्र येथे झाला. ब्रॅडमन कुटुंब ऑस्ट्रेलियात राहात असले तरी ते मूळचे इंग्लंडचे होते. त्यांचे आजोबा वर्ष 1852 मध्ये ऑस्ट्रेलियात स्थलांतरित झाले. सुरुवातीस 1920-21च्या हंगामात ब्रॅडमन यांनी त्यांचे काका जॉर्ज व्हॉटमन यांच्या नेतृत्वात स्थानिक बोरल संघासाठी क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
ते 12 वर्षांचे असताना त्यांनी पहिले शतक केले होते. त्यावेळी शालेय सामन्यामध्ये 125 धावा केल्या होत्या. ऑक्टोबर 1920मध्ये त्यांना संघात एक जण कमी होता म्हणून खेळण्याची संधी मिळाली. दरम्यान, त्यांच्या वडिलांनी त्यांना पाचवा ऍशेस कसोटी सामना पाहण्यासाठी सिडनी क्रिकेट ग्राउंडवर नेले होते. त्या दिवशी ब्रॅडमन यांना खेळाची महत्त्वाकांक्षा तयार झाली. ते आपल्या वडिलांना म्हणाले, मी या भूमीवर खेळत नाही तोपर्यंत मी कधीही समाधानी होणार नाही. 1922मध्ये ब्रॅडमन यांनी शाळा सोडली आणि स्थानिक रिअल इस्टेट एजंट म्हणून काम सुरू केलं. मॅटिंगओव्हर-कॉंक्रीट खेळपट्ट्यांवरील स्पर्धेत, बोराल बेरिमा जिल्हा स्पर्धेत इतर ग्रामीण शहरांमध्ये त्यांनी भाग घेतला. गोलंदाज बिल ओ’रेलीचा समावेश असलेल्या विंगेलोविरुद्ध ब्रॅडमनने 234 धावा केल्या तर मॉस व्हेलविरुद्धच्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात, त्यांनी नाबाद 320 धावा केल्या.
वर्ष 1926मध्ये ऑस्ट्रेलियन संघ इंग्लंडमध्ये मालिका हरला. तसेच अनेक खेळाडू निवृत्त झाले त्यामुळे नवोदित होतकरू खेळाडूंचा शोध सुरू झाला. ब्रॅडमन यांनी बोरलसाठी केलेल्या मोठ्या स्कोअरची आठवण ठेवून असोसिएशनने त्यांना सिडनी येथील सरावसत्रात हजेरी लावण्याची विनंती केली. त्यानंतर आठवड्यात खेळल्या जाणाऱ्या क्रिकेट आणि टेनिस या दोन्ही खेळासाठी “कंट्री वीक’ स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली. त्यांनी त्यापैकी क्रिकेटची निवड केली. कंट्री वीकमध्ये ब्रॅडमनच्या कामगिरीमुळे सेंट जॉर्ज फॉर सिडनी येथे 1926-27च्या हंगामात ग्रेड क्रिकेट खेळण्याचे आमंत्रण मिळाले. त्यांनी पदार्पणात 110 धावा केल्या आणि टर्फच्या खेळपट्टीवर पहिले शतक झळकावले.
न्यूझीलंड दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या संघासाठी त्यांची निवड केली गेली नाही. मात्र, शेफील्ड शिल्ड हंगामाच्या पहिल्या सामन्यात त्यांनी क्वीन्सलॅंड विरुद्ध प्रत्येक डावात शतक केले. त्यानंतर ब्रिस्बेन येथे खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यात निवड झाली. ब्रॅडमन यांनी 30 नोव्हेंबर 1928 रोजी पहिला कसोटी सामना इंग्लंड संघाविरुद्ध खेळत कसोटी क्रिकेटमध्ये प्रवेश केला आणि त्यांनी शेवटचा कसोटी सामनाही इंग्लंडविरुद्ध 14 ऑगस्ट 1949 रोजी खेळला. 20 वर्षांच्या कारकिर्दीमध्ये 99.94 या सरासरीने त्यांनी फलंदाजी केली. 52 टेस्टमध्ये 6,996 धावा आणि त्यांची सर्वोच्च धावसंख्या 334 होती. 25 फेब्रुवारी 2001 रोजी त्यांचे न्यूमोनियाने निधन झाले. त्यांचा जेथे जन्म झाला तेथे आता ब्रॅडमन बर्थप्लेस संग्रहालय उभारण्यात आले आहे.