चिक्कोडी – तालुक्यातील हिरेकुडी येथील नंदीपर्वत आश्रमाच्या जैन मुनींची निर्घृण हत्या झाल्याचे काल (ता. ७) रात्री उघडकीस आल्याने दिवसभर नंदीपर्वत मठाकडे भाविकांची रीघ लागली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटकातील बेळगावी जिल्ह्यातील हिरेकोडी गावातून बेपत्ता झालेले जैन मुनी नंदी महाराज यांची हत्या करण्यात आली आहे. हिरेकोडी गावातील नंदीपर्वत आश्रमाचे श्री १०८ कामकुमार नंदी महाराज हे दोन दिवसांपासून बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. ६ जुलैपासून जैन मुनी नंदीपर्वत आश्रमातून बेपत्ता असल्याची माहिती मिळाली आहे.
दरम्यान, 6 जुलै रोजी भक्तांनी जैन मुनींचा आश्रमाभोवती शोध घेतला मात्र ते सापडले नाहीत. जैनमुनी आचार्य श्री 108 कामकुमार नंदी महाराज यांच्या भक्तांनी ते बेपत्ता झाल्याची माहिती पोलिसांना दिली. यानंतर शुक्रवारी चिक्कोडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. जैनमुनी कामकुमार नंदी महाराज यांचे नंदीपर्वत आश्रमात गेल्या १५ वर्षांपासून वास्तव्य असल्याचे भाविकांनी सांगितले. चिक्कोडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असून संशयाच्या आधारे दोघांना ताब्यात घेतले आहे. तपासादरम्यान जैन मुनींची हत्या झाल्याचे निष्पन्न झाले. आरोपींनी चौकशीत खून करून मृतदेह फेकल्याची कबुली दिली. मात्र, पोलिसांनी रात्रभर कटकबावी गावात मृतदेहाचा शोध घेतला यावेळी मृतदेह सापडला नाही. बेळगावचे एसपी संजीव पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
याप्रकरणी एसपी म्हणाले की, जैन मुनी कामकुमार नंदी महाराज बुधवारी रात्रीपासून बेपत्ता असल्याची तक्रार भाविकांनी केली होती. भाविकांच्या तक्रारीवरून चौकशी करण्यात आली. या प्रकरणासंदर्भात त्यांच्या ओळखीच्या व्यक्तीकडे चौकशी केली असता, हत्येची माहिती मिळाली. एसपींनी सांगितले की, ‘संशयित मारेकरीमधील मुख्य आरोपी हा नेहमी मठात येत असे. शेतीच्या कामावरून त्याची नेहमी वर्दळ असायची. त्यातून त्यांचे आर्थिक व्यवहार झाल्याने व पैसे परत करता येत नसल्याच्या कारणावरून त्याने मुनींची हत्या केल्याचे भाविक सांगत होते. मुख्य आरोपीने आपल्या ट्रॅक्टरचालकाला बोलावून मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मृतदेह रायबाग तालुक्यात नेऊन त्याचे तुकडे करून कूपनलिकेत टाकले.’