लोकसभेत भाजप खासदारांकडून ‘जय श्रीराम’चा जयघोष

नवी दिल्ली – नवनिर्वाचित १७व्या लोकसभेचे पहिले अधिवेशनाला आज नवी दिल्ली येथील संसदभवनामध्ये सुरुवात झाली आहे. मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममधील हे पहिलेच अधिवेशन असून येत्या २६ जुलैपर्यंत अधिवेशन चालणार आहे. अधिवेशनाचा पहिलाच दिवस सत्ताधारी भाजपच्या खासदारांनी संसदभावनामध्येच ‘जय श्रीराम’ अशा घोषणा दिल्याने विशेष ठरला. याबाबत सविस्तर वृत्त असे की, संसदभवनामध्ये आज पश्चिम बंगाल येथील भाजपचे नवनिर्वाचित खासदार बाबुल सुप्रियो आणि देबश्री चौधरी शपथ ग्रहणासाठी पुढे आले असता संसदेमध्ये उपस्थित असलेल्या भाजप खासदारांनी त्यांचे ‘जय श्रीराम’ असा जयघोष करीत स्वागत केले.

गेल्या ३१ मार्च रोजी पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा ताफा जात असताना काही लोकांनी ‘जय श्रीराम’चा नारा दिल्याने संतापलेल्या ममता बॅनर्जी यांनी ‘जय श्रीराम’चा नारा देणाऱ्या ‘त्या’ ८ लोकांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. याबाबतचा ममता बॅनर्जी यांचा एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. या घटनेनंतर लोकसभा निवडणुकांदरम्यान भाजप नेत्यांनी ‘जय श्रीराम’ घोषणेवरून मनात बॅनर्जींना चांगलेच धारेवर धरले होते. तसेच देशभरातील हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांनी ममता बॅनर्जी यांच्या नावे ‘जय श्रीराम’ लिहिलेली पत्र पाठवली होती.

अशातच आज पश्चिम बंगालमधून लोकसभेवर निवडून आलेल्या खासदार बाबुल सुप्रियो आणि देबश्री चौधरी यांच्या मंत्रिपदाच्या शपथ ग्रहणावेळी भाजप खासदारांनी ‘जय श्रीराम’ अशा घोषणा देत पुन्हा एकदा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.