जेजुरी -येथील खंडेरायाच्या चंपाषष्ठी, देव दिवाळी उत्सवाला रविवारी (दि. 5) सकाळी प्रारंभ करण्यात आला. यानिमित्त श्रींची पहाटेची नित्य पूजा, भूपाळी आरती झाल्यानंतर मुख्य गाभाऱ्यात पाकाळणी करण्यात आली.
नित्य वारकरी, सेवेकरी, पुजारी यांच्या वतीने मार्तंड भैरव मूर्तींसह उत्सवमूर्तींना नवीन पोशाख परिधान करण्यात आले. तद्नंतर घडशी समाज बांधवांच्या सनई-चौघड्याच्या मंगलमय वाद्यात उत्सवमूर्ती बालद्वारी येथे आणण्यात आल्या.
वेदमूर्ती शशिकांत सेवेकरी यांच्या वेदमंत्र पठणात करवीर पिठाचे आध्य शंकराचार्य यांच्या हस्ते धार्मिक विधी होत दुपारी बाराच्या सुमारास घटस्थापना करण्यात आली. त्यानंतर जेजुरी शहरातील मानकरी ग्रामस्थांच्या घराघरांत घटस्थापना झाली.
यावेळी पुजारी गणेश आगलावे, प्रशांत सातभाई, सतीश कदम, अविनाश सातभाई, चेतन सातभाई, अनिल आगलावे, महेश बारभाई, संजय आगलावे, मिलिंद सातभाई, हरिभाऊ लांघी, समीर मोरे आदींनी चंपाषष्ठी उत्सव अन्नदान सेवा मंडळ यांनी धार्मिक विधींचे व महाप्रसादाचे आयोजन केले आहे.
घटस्थापनेनंतर देवसंस्थानच्या वतीने सव्वा कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या अद्ययावत म्हाळसा-बाणाई अन्नसेवा कक्षाचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी प्रमुख वतनदार इनामदार राजेंद्र पेशवे, देवसंस्थानचे प्रमुख विश्वस्त पंकज निकुडे, विश्वस्त राजकुमार लोढा, ऍड. अशोकराव संकपाळ, शिवराज झगडे,
संदीप जगताप, प्रसाद शिंदे, तुषार सहाणे, मुख्याधिकारी राजेंद्र जगताप, माजी विश्वस्त डॉ. प्रसाद खंडागळे, नितीन राऊत, रोहिदास माळवदकर, दत्तप्रसाद खाडे, राहुल दोडके, अर्जुन जगताप, माणिक पवार आदींसह देवसंस्थान कर्मचारी, अधिकारी उपस्थित होते.