पुणे – जनता सहकारी बॅंक लिमिटेड पुणेच्या प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी पदी (ऑफिशिएटींग सीईओ) जगदीश पुरुषोत्तम कश्यप यांची नेमणूक करण्यात आली आहे. काकतकर 31 डिसेंबर रोजी सेवानिवृत्त झाले. मावळते सीईओ जयंत काकतकर यांच्याकडून कश्यप यांनी 1 जानेवारी रोजी सीईओ पदाची सूत्रे स्वीकारली.
कश्यप गेली तीस वर्षाहून अधिक काळ जनता बॅंक पुणे येथे कार्यरत असून त्यांनी यापूर्वी विविध महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. सीईओपद स्वीकारण्यापूर्वी कश्यप जनता बॅंकेत महाव्यवस्थापक म्हणून काम करीत होते. ही माहिती बॅंकेचे अध्यक्ष माधव तथा अभय माटे यांनी दिली. जनता सहकारी बॅंकेच्या महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये एकूण 71 शाखा कार्यरत असून या शाखांद्वारे अत्याधुनिक सोयी सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून दिल्या जातात. 31 मार्च 2021 अखेर बॅंकेचा एकूण व्यवसाय 14 हजार 321 कोटींपेक्षा जास्त आहे.