पिंपरी, दि. 18 – शहराला अतिरिक्त पाणी पुरवठा उपलब्ध करुन देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या भामा आसखेड पाणी पुरवठा योजनेतील जॅकवेल उभारण्याची निविदा रक्कम 30 कोटींनी वाढविण्यात आल्याने यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप झाला. हे गंभीर प्रकरण उजेडात आले असताना आयुक्तांनी आता जॅकवेल बांधण्यासाठी नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांच्या जबाबदारीत बदल केला आहे. प्रकल्प अधिकारी कार्यकारी अभियंता देवण्णा गट्टूवार यांच्याकडील अधिकार काढून ते उपअभियंता दीपक पाटील यांच्याकडे देण्यात आले आहेत.
धरणातील पाणी उपसा करण्यासाठी जॅकवेल उभारण्यात येणार आहे. या कामासाठी आयुक्तांनी कार्यकारी अभियंता देवण्णा गट्टूवार यांची नेमणूक केली होती. मात्र, आता ही जबाबदारी ग क्षेत्रीय कार्यालयातील पाणी परवठा विभागाचे उपभियंता दीपक पाटील यांच्याकडे अतिरिक्त पदभाराद्वारे दिले आहेत. याबाबतचा निर्णय पाणी पुरवठा विभागाचे सह शहर अभियंता श्रीकांत सवणे यांनी घेतला आहे. त्याला आयुक्तांनी मान्यता दिली आहे.
महापालिकेतील सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त विठ्ठल जोशी यांनी आयुक्तांची मान्यता आणि विभागप्रमुखांची शिफारस विचारात घेत उपअभियंता पाटील यांच्याकडे भामा आसखेड प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता पदाचा अतिरिक्त पदभार दिला.
भामा आसखेड पाणी पुरवठा योजनेतील जॅकवेल बांधण्यासाठी पहिल्यांदा शंभर कोटींची निविदा राबविण्यात आली. एकाही ठेकादाराचा प्रतिसाद मिळाला नसल्यामुळे निविदेला तीनवेळा मुदतवाढ देण्यात आली. तरी देखील एकाही ठेकेदाराने निविदा भरली नाही. शेवटी आलेल्या ठेकेदाराला निविदा देण्यासाठी निविदा रक्कमेत 30 कोटीने वाढ करण्यात आली. त्यावर या निविदा प्रक्रियेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेस व अन्य पक्षांच्या नेत्यांनी केला होता. आता आयुक्तांनी कार्यकारी अभियंता गट्टूवार यांच्याकडील अधिकार काढून दीपक पाटील यांच्याकडे दिल्यामुळे शंका व्यक्त केली जात आहे.