पिंपरी- वाकड येथील कावेरीनगर पोलीस वसाहतीत राहणाऱ्या एका पोलीस कर्मचारी महिलेचे घर फोडून चोरट्यांनी सव्वासहा लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. ही घटना शुक्रवारी (दि. 17) पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास घडली.
याप्रकरणी 38 वर्षीय पोलीस कर्मचारी महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी पोलीस महिला पुणे शहर पोलीस दलात कार्यरत आहेत. त्यांचे घर गुरुवारी (दि. 16) दुपारी अडीच ते शुक्रवारी (दि. 17) सकाळी सव्वा अकरा वाजताच्या कालावधीत कुलूप लावून बंद होते.
शुक्रवारी पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास दोन चोरट्यांनी दरवाजाचा कोयंडा तोडून आत प्रवेश केला. पाच लाख 68 हजारांचे 152 ग्रॅम सोन्याचे आणि 20 हजारांचे चांदीचे असे एकूण सहा लाख 28 हजार 500 रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून चोरट्यांचा शोघ घेतला जात आहे.