संयुक्त राष्ट्र – करोनाच्या प्रतिबंधासाठी करण्यात येत असलेल्या चाचण्यांचे सकारात्मक निष्कर्श मिळायला लागले आहेत. याचा अर्थ आता करोनाची साथ संपुष्टात येण्याची स्वप्ने बघायला हरकत नाही, असा आशावाद जागतिक आरोग्य संघटनेचे सरचिटणीस टेड्रोस अधनॉम घेब्रेयसिस यांनी व्यक्त केला आहे.
मात्र त्याचबरोबर लसीसाठीच्या भाऊगर्दीमध्ये श्रीमंत आणि सामर्थ्यवान देशांनी गरीब आणि वंचित देशांना तुडवले तुडवता कामा नये, असा इशाराही त्यांनी दिला. करोनाच्या साथीसंदर्भात संयुक्त राष्ट्राच्या आमसभेच्या पहिल्या उच्चस्तरिय अधिवेशनाला संबोधित करताना त्यांनी “करोनाच्या विषाणूला रोखता येऊ शकेल. मात्र त्यानंतरचा मार्ग विश्वासघाताचा आहे.’ असे सूचक वक्तव्य केले आहे.
करोना काळात जगाने माणसाची चांगले रुप पाहिले. तसेच वाईटही रुप पाहिले आहेत. या साथीच्या काळातच स्वार्थ, आरोप-प्रत्यारोप आणि गटबाजीही जगाला बघायला मिळाली आहे. मात्र ही साथ संपली तरीही गरीबी, भूक आणि असमानता यामध्ये परिवर्तन होऊ शकते हे विसरुन चालणार नाही, असेही ते म्हणाले.
जगात करोनाचे रुग्ण पुन्हा वाढायला लागलेले दिसत आहेत. त्यावेळी कारस्थानामुळे विज्ञानाचीही पायमल्ली होते. दृढ ऐक्याचेही विभाजन होते. त्यागाची जागा स्वार्थाने घेतली जाऊ शकते. त्यावेळी विषाणू वाढतो आणि पसरतोही. या खोलवर रुजलेल्या मानसिकतेवर लस कोणताही परिणम करू शकत नाही, असे ते म्हणाले.