स्वत:वर विजय मिळवणे महत्वाचे

– हर्षद कटारिया 

भगवान महावीरांनी दिलेले अहिंसा हे योगदान फक्त भारतातच नव्हे तर पूर्ण जगाला दिशादर्शक ठरले आहे. सत्य हे स्वत:च शोधावे त्यासाठी सुरवातही स्वत: पासून करावी स्वत:वर विजय मिळवीत शरण जायचे तेही स्वत:लाच. प्रत्येक व्यक्तीला महावीर होण्याचा अधिकार आहे असे भगवान महावीर मानत. महावीरांच्या जीवनाचे तत्वसार हे त्यांच्या अमृत वाणी मधून प्रकटले आहे. भगवान महावीरांच्या प्रवचनांमधून भारतीय संस्कृतीचे श्रेष्ठत्व संपूर्ण जगासमोर आले आहे. महात्मा गांधींच्या जीवन प्रवाहातील कबुलीचा विचार हा जैन धर्मातील क्षमातत्वांशी जोडणारा आहे,

अहिंसेचे पालन करणाऱ्या सर्व लोकांना मी जैनच समजतो असे महात्मा गांधी म्हणत. आज 21व्या शतकातही युवकांना अहिंसेची प्रेरणा देणारे शांतिमय आयुष्य जगण्यास प्रेरित करणारे महावीरांचे विचार प्रेरणा देतात. बिहार मधील वैशाली हे क्षेत्र भगवान महावीर यांची जन्मभूमी आहे. भगवान महावीरांचे विचार, शिकवण कोणत्या एका विशिष्ट जातीसाठी समाजासाठी किंवा धर्मा साठी नसून ते साऱ्या विश्वाला अहिंसेचा, शांतीचा व संयमाचा व माणूसकीचा विचार देणारे आहेत. आजही भगवान महावीर यांचे विचार,शिकवण सकारात्मक, शांतिप्रिय, अंहिसायुक्त जीवन जगण्यास प्रेरणा देतात. विश्‍वात कणाकणांमध्ये जीवाचे अस्तित्व आहे. हे मान्य करून कोणासही कोणत्याही प्रकारचे दुःख होईल अशी कोणत्याही प्रकारची हिंसा करू नये अशी जीवन पध्दती जगावी असा उपदेश वैशालीचे महापुत्र महावीरांनी दिला.

वाढत्या जागतिकीरणात तंत्रज्ञानात आणि स्पर्धेच्या युगात तरुणांना नैराश्‍य येण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कौटुंबिक संबध, शिक्षण, नोकरी जबाबदारीबाबत प्रचंड तणाव निर्माण होण्याचे प्रमाण वाढत आहे वैचारिक पातळी प्रचंड खालावत आहे. तरुणांना मोबाईल,इंटरनेट, सोशल मिडिया हे गरज नाही तर व्यसन बनत आहे. उदासीनता, चिडचिड, रागाचे प्रमाण वाढत असल्याने हिंसा वाढत आहे आणि बऱ्याच वेळा याचे रूपातंर विकृतीत होते. पैशाचा हव्यास,पैसाच्‌ सर्वस्व मानून मानवतेपासून दूर होऊ पाहणाऱ्या माणूसकी विसरणाऱ्या आजच्या पिढीला भगवान महावीर यांचे विचार आजही नक्कीच अहिंसा व शांतिमय जीवन जगण्यास आदर्श ठरतील हे मात्र नक्की. मनाचा समतोल ढासळून न देता शांत चित्ताने कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाणे ही कला अवगत होणे आत्मसात करणे आजच्या काळात गरजेचे आहे.

आजच्या काळात भ्रष्टाचार, फसवणूक, सत्तेचा गैरवापर, घोटाळे यातही लोकशाही व्यवस्थेत आपण जगताना महावीर स्वामी यांच्या अनेकांतवादाची व महावीरांच्या उपदेशाची जोड़ जर लोकशाहीला मिळाली तर भारतात सर्वोत्तम कारभार चालेल यात शंका नाही. कारण दूसऱ्यावर अनुशासन ठेवण्यापेक्षाही महत्वाचे आहे स्वत:वर अनुशासन ठेवत आरंभ करणे
सूर्यास्त पूर्वी जेवण करावे. रात्री सातच्या आत जेवण करणे हे आरोग्यासाठी चांगले असते. पाणी उकळून प्यायल्याने आपले अनेक आजारांपासून संरक्षण होते. या चांगल्या संकल्पना त्याच्या मागील शास्त्रीय कारण आजही आपण लक्षात घ्यायला हवे.

आज पाणी उकळून घेण्यापेक्षा आपण मिनिरल घेतो. याचा अर्थ आपण आपल्या आरोग्याविषयी संवेदनशील आहोत असाच होतो. पूर्वीच्या काळी या सगळ्या सुविधा नव्हत्या. आणि आता या सुविधा उपलब्ध आहेत. हा फरक लक्षात घेण्यासारखा आहे. म्हणजेच भगवान महावीरांनी दिलेली आचार संहिता ही शास्त्रीय दृष्ट्या सुद्धा बरोबर सिद्ध झाली आहे. काळ कितीही पुढे गेला तरी भगवान महावीरांनी दिलेली तत्वे, सिद्धांत, आचारसंहिता हि कायम लोकांसाठी, समाजासाठी जास्तीत जास्त मूल्यवान ठरणारच आहे आणि त्यामुळे जगामध्ये शांतता प्रस्थापित होण्यास मदतच होणार आहे. या मुल्यामुळे समाजात लोकांना निरोगी आरोग्य, मानसिक शांतता एवं स्थिरता राहण्यास मदत होणार आहे.

ही विचारधारा मानवाला चिरकाल मार्गदर्शन करीत राहणार आहे. भगवान महावीर यांनी जिनदीक्षा घेण्याआधीच्या काळात गावात एक हत्तीने धुमाकूळ घातला. दिसेल त्याला तुडवत गावात मोठे नुकसान केले. ही माहिती मिळताच महावीरांनी तेथे जाऊन हत्तीला शांत केले. गावकऱ्यांनी महावीरांचा जयजयकार केला. त्यावेळी महावीरांनी गावकऱ्यांना प्रबोधित करत सांगितले की पशुला जिकंण्यापेक्षा स्वत:ला जिकंण्यात खरी वीरता आहे. आपल्या राष्ट्रीय अस्मितेला जागतिक पातळीवर महत्त्व प्राप्त करून देण्याचे काम महावीरांनी केले. भगवान महावीरांनी दिलेल्या अहिंसेच्या संदेश मुळे संपूर्ण जगाला सकारात्मक प्रेरणा व शांतिने जीवन जगण्याची कला मिळाली.

भारतीय संस्कृतीचे महत्व महावीरांच्या प्रवचनामध्ये एकवटले आहे. भगवान महावीर हे जैन धर्माचे चोविसांवे तीर्थंकर होते. महावीर 28 वर्षाचे असताना त्यांचे आई-वडील स्वर्गवासी झाले. वयाच्या 30 व्या वर्षी त्यांनी गृहत्याग केला. ऐश्वर्य, घर, नाती सोडून त्यांचा त्याग केला. घनदाट जंगलात ध्यानस्त राहून तप केले. तपाच्या सहाय्याने ते आत्मज्ञानी बनले. त्यांनी स्वत:वर विजय मिळविला. अहिंसा हा महावीरांचा आधारभूत सिध्दांत आहे. भूतदया हे महावीरांच्या जैन धर्माचे मुख्य तत्व आहे. जगा आणि जगु दया हा महान सिध्दांत महावीरांनी सांगितला आणि विश्वात अहिंसेचा प्रसार केला. भगवान्‌ महावीरांनी वेद,कर्मकांड, यज्ञ यामध्ये होणारी पशूंची हत्या या प्रथेला तीव्र विरोध केला. अहिसेंच्या तत्वाला महावीरांनी विशेष महत्त्व दिले. भगवान्‌ महावीर यांची जगा आणि जगु दया, अहिंसा, अनेकांतवाद या उपदेशाची शिकवण मानणाऱ्या सर्व आनुयायांनी अहिंसावादी व आदर्शदायी भविष्यासाठी आजच्या परिस्थितीत एकत्र येणे गरजेचे आहे.

फ़क्त मीच तो खरा हा अट्टाहास जेव्हा माणसामधून कमी होतो तेव्हाच प्रेम, आपुलकी व जिव्हाळा यांना मनात जागा मिळू शकते हीच महावीरांची शिकवण होती हीच शिकवण आजच्या तरुणांना सुखी व सकारात्मक जगण्यासाठी ऊर्जा स्त्रोत ठरेल.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.