ऑनलाइन अर्ज भरण्याला मुदतवाढ; सरळसेवेच्या रिक्त पदांसाठी भरती

पुणे – जिल्हा परिषदेअंतर्गत सरळसेवेच्या रिक्त पदांसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली आहे. येत्या 23 एप्रिलपर्यंत ही मुदतवाढ देण्यात येत असल्याच्या सूचना सर्व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना ग्रामविकास व पंचायत राज विभागाकडून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे या मुदतवाढीचा तरुणांना अधिक लाभ होणार असून, अर्ज भरण्यापासून वंचीत राहिलेल्यांना आता अर्ज भरता येणार आहेत.

जिल्हा परिषदेअंतर्गत सरळसेवेची रिक्त पदे भरण्यात येणार असून, त्यामध्ये गट-क संवर्गातील अनुसूचित क्षेत्राबाहेरील (बिगर पेसा) 584 पदे आणि अनुसूचित क्षेत्रातील (पेसा) 11 पदे असे एकूण 595 पदांची भरती करण्यात येणार आहे. त्यासाठी 26 मार्चपासून ऑनलाइन अर्ज भरती प्रक्रियेला सुरवात झाली असून, अर्ज भरण्याची अंतीम मुदत 16 एप्रिल होती. परंतु, अनेक विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्याचे राहून गेल्याचे ग्रामविकास विभागाच्या निदर्शनास आले. त्यामुळे अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सात दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे.

या पदांसाठी होणार भरती
भरती प्रक्रियेत अनुसूचित क्षेत्रातील (बिगर पेसा) आरोग्य सेविका – 272, सेवक (पुरूष) – 61 आरोग्य सेवक (पुरूष, हंगामी फवारणी कर्मचारी) – 112, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) – 15, कंत्राटी ग्रामसेवक – 15, औषध निर्माता – 16, प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 3, विस्तार अधिकारी (कृषी) – 3, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक – 51, पशुधन पर्यवेक्षक – 4, वरिष्ठ सहायक (लेखा) – 13, पर्यवेक्षिका (नामनिर्देशनाने) – 5, वरिष्ठ सहायक (लिपीक) – 10, कनिष्ठ लेखाधिकारी 4 ही पदे भरण्यात येणार आहे. तर अनुसूचित क्षेत्रातील (पेसा) : आरोग्य सेवक (पुरूष, हंगामी फवारणी कर्मचारी) 1 आणि आरोग्य सेविका 10. अनुसूचित क्षेत्रातील संवर्गनिहाय पदे ही शासन अधिसूचनेनुसार जिल्ह्यातील स्थानिक अनुसूचित जमातीतील उमेदवारांसाठी राखीव असून, स्थानिक उमेदवारांनाच अर्ज करता येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.