पीएमपीएमएल बसमधील “आयटीएमएस’ यंत्रणा बंद

PMPML, Pune

पुणे – पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या अनेक बसेसमधील “इंटेलिजन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ (आयटीएमएस) यंत्रणा बंद आहे. तर ज्या बसेसमध्ये ही यंत्रणा सुरू आहे, अशा बसचे चालक ती सुरू करत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे प्रशासनाला बसेसचे “लोकेशन’ समजण्यास अडचणी येत आहेत. परिणामी प्रशासनाने चालकांना “आयटीएमएस’ यंत्रणा सुरू ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.

बस सुरू झाल्यानंतर बसचे लोकेशन समजण्यासाठी आयटीएमएस यंत्रणा सुरू करण्यात आली. त्यावर लॉग इन करण्यासाठी चालकाला बसमध्ये सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. लॉग इन केल्यानंतर बस कुठे आहे याची माहिती पीएमपीच्या मुख्य कार्यालयातील कंट्रोल रूमला समजते. मात्र, अनेक कर्मचारी बस सुरू केल्यानंतर आयटीएमएसवर लॉग इन करत नसल्याने प्रशासनाला बसचे लोकेशन समजत नाही. त्यामुळे प्रशासनाने कार्यालयीन परिपत्रक असून यंत्रणा सुरू ठेवण्याच्या सूचना दिल्या असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

यापूर्वी केली होती कारवाई
तत्कालीन अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी बसथांब्यावर किमान 8 सेकंदांपेक्षा कमी अथवा गाडी न थांबवणाऱ्या (स्टॉप स्किपिंग) चालकावर दंडात्मक कारवाई करण्यास सुरुवात केली होती. पीएमपीएमएल बसेसला असणाऱ्या आयटीएमएस यंत्रणेच्या माध्यमातून स्टॉप स्किपिंगची माहिती समजत असे. मात्र, सद्यस्थितीत पीएमपीएमएलची आयटीएमएस यंत्रणा काम करत नसल्याने स्टॉप स्किपिंगवर प्रशासनाचे नियंत्रण राहिले नाही. यामुळे चालकांकडून थांब्यावर गाडी न थांबवण्याचे प्रकार पुन्हा सुरू झाले आहेत, अशा तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)