नवी दिल्ली – योगगुरु रामदेव आणि इंडियन मेडिकल असोसिएशन म्हणजेच आएमए यांच्यात सुरु झालेला वाद अजूनही थांबलेला नाही. आता पुन्हा एकदा रामदेव बाबांनी घुमजाव केले आहे. रामदेव यांनी कोरोनावरील लस घेणार असल्याचे जाहीर केले आहे. त्याचबरोबर सर्वांना बाबा रामदेव यांनी लस घेण्याचे आवाहन देखील केले आहे. तसेच योग कोरोनापासून होणाऱ्या समस्या कमी करण्यास मदत करत असल्याचे देखील सांगायला विसरले नाहीत.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ जूनपासून देशातील १८ वर्षांवरील सर्वांचे मोफत लसीकरण केले जाईल, अशी घोषणा केली आहे. त्यानंतर योगगुरु यांनी लस घेण्याचे आवाहन केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
रामदेव यांचा एका व्हायरल व्हिडिओत करोनाच्या मृत्यूमागे अॅलोपॅथी कारण असल्याचं सार्वजनिकरित्या सांगितलं होतं. करोना रुग्णांवर अॅलोपॅथी औषधांचा मारा केल्यानेच त्यांचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला होता. त्यांच्या या विधानामुळे करोनाकाळात रुग्णांची सेवा करण्याऱ्या डॉक्टरांनी आक्रमक पवित्रा घेतला होता.